हेअर स्ट्रेटनिंग, हायलायटिंग करून घेणं हल्ली कॉमन झालंय. हेअर स्टायलिंग केल्याने छान ‘मेक ओव्हर’ केल्यासारखं वाटतं हे खरं, पण त्यानंतरच खरे केसांचे प्रश्न सुरू होतात. स्टायलिंग करताना काय काळजी घ्यावी याबाबत केस आणि त्वचारोगतज्ज्ञ रश्मी शेट्टी यांनी दिलेला सल्ला.
हेअर स्टायलिंग करायला सगळ्यांनाच आवडतं. हेअर स्ट्रेटनिंग, हायलायटिंग हे तर हल्ली खूपच कॉमन झालेय. केसांच्या वेगवेगळ्या स्टायलिंगसाठी मुली वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घ्यायला तयार असतात. अशा हेअर ट्रीटमेंट्समुळे, स्टायलिंगमुळे चेहऱ्याला एकदम नवा लूक येतो. सौंदर्योपचारांमध्ये हेअर स्टायलिंगची महत्त्वाची भूमिका असते, हे खरे; पण सारखी सारखी नवी हेअर स्टाइल करून, कधी हेअर स्ट्रेटनिंग, तर कधी कलर्स काढून केसांचे आरोग्य धोक्यात येते. केस कमजोर होतात आणि मग गळायला लागतात. स्टायलिंगनंतर केसांचे प्रश्न सुरू होत असतील, तर ती करावी की नाही? स्टायलिंगपूर्वी आणि नंतर काय काळजी घ्यावी हे माहिती हवे असेल तर केसांची रचना लक्षात घेणे आवश्यक आहे.
केस प्रोटीनपासून बनलेले आहेत. परागमंडलात पाकळ्या असतात, तशीच केसांची रचना असते. त्यामुळे कुठलेही तीव्र उपचार, तीव्र उष्णता केसांच्या मुळांना कमकुवत करू शकतात. त्यामुळे केस रूक्ष बनतात, कारण अशा बाह्य़ोपचारांमुळे केसांची मुळे कमकुवत होतात, त्यातील आद्र्रता कमी होते. याचा परिणाम म्हणजे केस अगदी नाजूक अवस्थेत पोहोचतात आणि सहजासहजी मुळापासून दूर होतात. म्हणजेच केस गळायला लागतात. केसांवर वारंवार असे उपचार करून घेणं म्हणजे केसांना कमजोर बनवण्यासारखं आहे. अशाने केसांचा पोत बिघडतो, केस गळायला लागतात आणि विरळ होतात.
केसांच्या ट्रीटमेंटमुळे सहज ‘मेक ओव्हर’ करता येतो. त्यामुळे आपणही केसांवर वेगवेगळे प्रयोग करून घेण्यास राजी असतो, पण मग हे साधायचं कसं? यावर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सतत हे प्रयोग करत राहू नये. केसांवर एखादा प्रयोग केल्यानंतर जरा वेळ द्यावा. बाह्य़ोपचारानं कमजोर झालेल्या मुळांची विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावेत. केसांचं आरोग्य पूर्वावस्थेत आल्यानंतरच मग पुढच्या ट्रीटमेंटचा विचार करावा. केसांमधील रूक्षता कमी होऊन मूळचे मॉइश्चर परत आले की मगच पुढचे उपचार घ्यावेत. खोबरेल तेल हे केसांना आवश्यक पोषण द्यायचा साधा, पारंपरिक तरीही सर्वात प्रभावी उपाय आहे. केस तेलांच्या मुळापर्यंत पोहोचते आणि केलांची लवचीकता वाढवते. त्यामुळे केस मजबूत होतात, गळायचे थांबतात. तेल लावल्याने केसाची रूक्षता कमी होते. केसांना तेल लावून शक्यतो रात्रभर ठेवावे आणि मगच केस धुवावेत.
कुठल्याही नव्या हेअर स्टाइलसाठी हेअर ट्रीटमेंट घेतल्यास किंवा हेअर कलरिंग केल्यानंतर केसांची विशेष काळजी घ्यावी. शक्यतो अशी हेअर स्टाइल करण्याअगोदरच्या रात्री केसांना व्यवस्थित तेल लावून चांगल्या शँपूने केस धुवावेत. शँपू पाण्यात कालवून लावावा म्हणजे जादाचा शँपू लावावा लागणार नाही. हेअर स्टायलिंगनंतर किंवा कलरिंगनंतर लगेच कडक उन्हात किंवा वाऱ्यावर जाणे टाळावे. केस बांधण्यासाठी घट्ट रबर किंवा घट्ट पिना अशा करकचून बांधणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज वापरू नयेत.
हेअर स्टायलिंगनंतर केस गळण्याचे प्रमाण वाढल्यासारखे वाटले तर केसांचे आरोग्य राखण्यासाठी वेगळी काळजी घ्यावी लागेल. अशा वेळी ओमेगा ऑइल, मल्टिव्हिटॅमिन्स आणि अमायनो अ‍ॅसिडसारख्या व्हिटॅमिन सप्लीमेंट्स घेणे फायद्याचे ठरू शकते. केस धुण्यासाठी थंड किंवा कोमट पाण्याचाच वापर करावा. कडक गरम पाणी वापरू नये.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी केवळ बाह्य़ोपचार उपयोगाचे नाहीत. व्यवस्थित संतुलित आहार केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. केसांसाठी जेवणात प्रथिनेयुक्त पदार्थ असलेच पाहिजेत. डाळी, कडधान्य, पनीर, अ‍ॅव्होकॅडो, पालक, ब्रोकोलीसारख्या हिरव्या भाज्या यामध्ये केसांसाठी आवश्यक पोषक द्रव्य असतात. मध, दही, स्ट्रॉबेरी, व्हिनेगर यांचा वापर करून घरच्या घरी हेअर मास्क तयार करू शकता. हे केसांना लावून मग केस धुतल्याने केसांची हानी भरून निघण्यास मदत होते.