उंदीरमामांचे ढोलपथक.. दीपमाळांची आरास.. कैलास मानसरोवराची झलक देणारे मखर.. असा सारा जामानिमा बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत दाखल झाला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी थर्माकोल, पर्यावरण स्नेही, काच, प्लास्टिक यासह मातीच्या साहाय्याने निर्मिलेल्या विविध आकारांतील आणि रंगांतील आकर्षक वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. त्यांच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली असली तरी गणेशभक्त ही झळही आनंदाने सोसत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांत सार्वजनिक असो वा घरगुती गणेशोत्सव त्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. पाटावर अथवा चौरंगावर विराजमान होणाऱ्या बाप्पाचा थाट वाढावा यासाठी भक्तांनी सजावटीवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्राहकांची बदलती अभिरुची लक्षात घेत सजावटीच्या साहित्यात कल्पकता आणली जात आहे. यंदाही विविध आकार तसेच प्रकारातील वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. पारंपरिक पूजेच्या साहित्याची प्रतिकृती म्हणून काचेचा दिवा, पूजेचा काचेचा तांब्या, तबक, सुपारी, पंचपाळी असे साहित्य ५० रुपयांपासून उपलब्ध आहे. थर्माकोलच्या मूषकाच्या जोडीसह सहा उंदीरमामांचे ढोलपथक गणराजाचे स्वागत करणार आहे. १०० रुपये किंमत असलेल्या पथकात ढोल, तुतारीसह इतर वाद्यांचा समावेश आहे.
अखंड तेवणारे दीप सध्याच्या जमान्यात शक्य नसल्याने इलेक्ट्रिक तसेच थर्माकोलच्या आकर्षक दीपमाळा बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय ५० रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत थर्माकोलची कलात्मक आसने उपलब्ध आहेत. त्यात होडी, झुला, मोरासन, गरुडासन, बालाजी, पक्ष्यांच्या आकारातील, सूर्यासन आदींचा समावेश आहे. तसेच ‘डेस्क बोर्ड’पासून तयार केलेली आसने विद्युत रोषणाईसह साडेतीन हजारांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. थर्माकोलची मंदिरे खिशाला परवडत नसतील तर सहा इंचांच्या थर्माकोलच्या खांबांसह १०-१२ फूट लांब अशी कार्व्हिग केलेले खांब ५ रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत व ते रंगविण्यासाठी १८०-२०० रुपये किमतीचे विविधरंगी ‘मेटॅलिक स्प्रे’ बाजारात
आहेत.
मोत्यांची माळ ५ ते ५० रुपयांपर्यंत, सिंहासनाभोवती सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम फुलांच्या माळा २० ते ६० रुपयांपर्यंत, आकर्षक रंगबेरंगी फुलांच्या विविध कमानी, त्यामागे झुळझुळणारे तलमी किंवा जाळीचे पडदे ३०० ते तीन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेते भूषण सोमवंशी यांनी सांगितले. गतवर्षीच्या तुलनेत सजावट साहित्यात १०-१५ टक्के वाढ झाली असली तरी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कायम आहे. सजावटीसाठी मूर्तीमागे लावण्यात येणारे चक्र, नक्षीदार व चमकी असलेल्या लहान चादरीसह झुंबर, मुकुटांचे विविध प्रकार, झिरमिरणाऱ्या रंगीत पताका अशा डझनाहून अधिक वस्तू गणेशभक्तांचे लक्ष वेधत आहेत.