उड्डाणपुलालगतच्या मार्गावरील स्थिती
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील मार्ग वाहतूक पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून अनेक लहान-मोठय़ा अपघातांचा हा मार्ग साक्षीदार होत आहे. या रस्त्यावर कुठेही उभी राहणारी खासगी वाहने हा इतर वाहतुकीसाठी सर्वाधिक धोका आहे. रस्त्यावर वाहने उभी करून प्रवासी भरणाऱ्या टॅक्सी, रिक्षा, व्हॅन तसेच खासगी बसेस अपघातास निमंत्रण देत असून ही वाहने रस्त्यावर उभी राहू नयेत यासाठी पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. पंचवटीत या मार्गावर स्वामी नारायण मंदिरासमोर तसेच औरंगाबाद चौफुलीजवळ गतिरोधक आहेत. या ठिकाणी सिग्नल व्यवस्थाही कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु ही व्यवस्था महिन्यातून एखाद्या दिवशीच सुरू असते. त्यामुळे येथे सिग्नल यंत्रणा बसवून नेमके काय साध्य करण्यात आले आहे तेच कळत नाही.
सिग्नल यंत्रणा बंद असताना पोलिसांनी याठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्याची गरज आहे. परंतु बहुतेकवेळा पोलीस गायबच असतात. डॉ. अहिरराव रूग्णालयासमोर शहरातून येणारी वाहतूक जेव्हा उड्डाणपुलाखालील रस्त्यावर येते. त्याठिकाणी वळणावरच हमखास रिक्षा किंवा व्हॅन प्रवासी भरण्यासाठी थांबतात. अशावेळी त्यांच्यामागून येणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होते. वळणावरच थांबलेल्या रिक्षा किंवा व्हॅनमधील प्रवासी उतरताना किंवा चढताना रस्त्यावरील वाहतुकीकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. वळणावर थांबणारी वाहने हटविण्याची गरज आहे.
औरंगाबाद चौफुली तर अगदीच पोलीस चौकीजवळ आहे. असे असतानाही याठिकाणी वाहतुकीचे कोणतेही नियोजन करताना पोलीस दिसत नाहीत. वाहनधारकांना स्वत:च आपला मार्ग शोधावा लागतो. प्रत्येक जण पुढे जाण्याची घाई करत असल्याने ही परिस्थिती अपघातासाठी पूरक ठरत आहे. अशीच स्थिती काटय़ा मारूती पोलीस चौकीजवळ आढळून येते. याठिकाणच्या चौफुलीवर तर वाहतूक पोलीस कधीच दिसत नाहीत. पोलीस चौकीजवळील झाडाच्या सावलीत हे महाशय उभे असलेले दिसतात. चौफुलीवर वाहतुकीचा कितीही खेळखंडोबा होत असला तरी येथील वाहतूक पोलीस जागचे हलायला तयार नसतात. विशेष करून सायंकाळच्या सुमारास या चौफुलीवर वाहतुकीची कोंडी ठरलेली असते. सायंकाळी उन्हाचा त्रास होत नसतानाही वाहतूक पोलीस चौफुलीवर उभे राहण्याचे का टाळतात, असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणाऱ्यांना याठिकाणी कोणताच अटकाव होत नाही. प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षांकडेही डोळेझाक केली जाते. हे प्रकार रोखण्याची गरज वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.