पतंगांचा कागद घरी आणून, बच्चेकंपनीने साग्रसंगीत लांबच लांब झिरमिळ्यांचा आकाशकंदिल बनवण्याचे फुरसतीचे दिवस केव्हाच मागे सरलेत.. दिवाळीच्या चार दिवसांसाठी बाजारातले विकतचे कंदिल आणण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. मात्र लोकांची हौस आणि वाढलेली क्रयशक्ती याला खतपाणी घालत विविध आकारातील, बनावटीचे व आकर्षक कंदिलांनी बाजारपेठ फुलली आहे. १०० रुपयांपासून सुरू होत असलेल्या कंदिलांच्या किंमती थेट ३००० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. कागदाऐवजी फोिल्डग करून काही वष्रे वापरता येण्याजोगे प्लास्टिकचे कंदिल लोकप्रिय झाले होते. मात्र हल्ली दरवर्षी नव्या प्रकारातील कंदिल विकत घेण्याची प्रथा पडत चाललेली दिसते. ग्राहकांच्याही ‘वेगळ्या’ कंदिलाच्या मागणीची पूर्तता करताना बाजारात दरवर्षी नवनवीन कंदिलांची भर पडताना दिसते. दोन वर्षांपूर्वी कमळाच्या पाकळ्यांच्या बनावटीचे कंदिल लोकप्रिय ठरले होते. घरी आणून जोडकामाचा आनंद देणारे कागदी फोिल्डग कंदिलांची विक्रीही जोरात होती. चायनीज बनावटीचे लॅम्पप्रमाणे उपयोग करता येणाऱ्या आकाशकंदिलांनी अनेकांची दारे सजली होती. कागदी आणि प्लास्टिक बनावटीच्या या कंदिलांनी यावेळीही बाजारपेठ सजली आहे. १०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या कागदी चांदण्यांनाही ग्राहकांची मागणी आहेच. मात्र या कंदिलांमध्ये सध्या लोकरी धाग्यांनी विणलेले तसेच वेताचे कंदिल लक्ष वेधून घेत आहेत. यापूर्वीही धाग्यांनी विणलेले कंदिल बाजारात आलेले असले तरी यावेळी नवे डिझाइन आणि मण्यांनी दिलेला नवा लूक अधिक मोहक आहे. सध्या तरी या कंदिलाची किंमत फक्त १२०० रुपये आहे. मात्र हा कंदिल यावेळचा बाजारातील सर्वात महागडा नाही. तो मान मिळवलाय वेताच्या कंदिलांनी. वेताच्या कंदिलांचा प्रवेश साधारण दोन वर्षांपूर्वीचा.. सुरुवातीला वेताच्या कंदिलाला लोकरीच्या धाग्यांची गुंफण होती. हे कंदिल बाजारात यशस्वी ठरल्यावर त्यावर मणी, खडे लावून श्रीमंती थाट दिला गेला आहे. कंदिलाचा आकार, डिझाइन, त्यावरील नक्षीकाम यावरून त्याची किंमत ठरत असून दादर बाजारातील एका कंदिलाची किंमत थेट ३००० रुपयांवर पोहोचली आहे. दिवाळीच्या चार दिवसांसाठी कंदिल विकत घेतला जात असला तरी नंतर घरात वर्षभर लावता येतो. हा कंदिल बहुतेक सर्वच घरांच्या इंटिरिअर डिझायिनगमध्ये फिट बसतो. यावर्षी पहिल्यांदाच कंदिलाची किंमत तीन हजारापर्यंत पोहोचली असली तरी हौशी ग्राहक तो खरेदी करणार याची खात्री आहे, असे कंदिलविक्रेत्याने सांगितले.