ज्येष्ठ गायक पं. अण्णासाहेब थत्ते यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत त्यांच्या शिष्य परिवाराने शंकराचार्य न्यास सहकार्याने शनिवारी सायंकाळी सहा वाजता शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित केली आहे. पंडिता अलका देव मारुलकर यांच्या गायनाने ही मैफल खुलणार आहे.
गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य संकुलात हा कार्यक्रम होईल. नाशिकमध्ये घराणेदार गायकी रुजावी यासाठी पं. अण्णासाहेब तथा गोविंदराव थत्ते यांनी अथक प्रयत्न केले.
त्यांच्या प्रयत्नामुळे अभिजात शास्त्रीय संगीताची आवड असलेला आणि घराणेदार गायकीचा अभ्यास करणारा एक डोळस वर्ग शहरात तयार झाला आहे. त्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन पं. अण्णासाहेब थत्ते शिष्य परिवाराने केले आहे. पं. अलका देव मारुलकर यांचे संगीताचे प्रदीर्घ शिक्षण त्यांचे वडील पं. राजाभाऊ देव यांच्याकडे झाले. ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर या तिन्ही घराण्यांच्या गायकीचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. जयपूर घराण्याचे गुरू पं. मधुसूदन कानेटकर यांची तालीमही मारुलकर यांना प्राप्त झाली आहे. त्यांच्या शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल भारतात आणि भारताबाहेर अनेक मैफलींत त्यांना निमंत्रित करण्यात आले. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. मैफलीत सुभाष दसककर (संवादिनी), नितीन वारे (तबला) संगीतसाथ करणार आहेत. स्वरांची साथ सुरश्री शिवान मारुलकर दसककर आणि स्वराली पणशीकर करणार आहेत. नाशिककर संगीतप्रेमींनी मैफलीस उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.