आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीने दुबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४वी जयंती उत्साहात अभिनव पद्धतीने आयोजित करण्यात आली. ओमान, कतार, बहरैन, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, यू.ए.ई. आणि भारतातून आलेल्या आंबेडकरी अनुयायी एकत्र आले आणि बाबासाहेबांना अभिवादन केले. इंडियन अकॅडमी स्कूल, दुबई येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. विवेककुमार उपस्थित होते.
पंजाबी, तेलगु, तामीळ, मराठी, हिंदी अशा भारतीय भाषकांचा सक्रिय सहभाग होता. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ जनसामान्यांचे नसून आधुनिक भारताचे जनक आहेत. भारतच नव्हे तर अखिल मानवाच्या कल्याणाचा उद्धारकर्ता असल्याने त्यांचे कार्य विश्वव्यापी आहे, असा संदेश देण्यात आला. विविध देशातील जवळपास ७०० आंबेडकर अनुयायी दुबईत जमले होते. दिवसभर वैचारिक मंथन आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अरब देशात पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आंबेडकर इंटरनॅशनल मिशनची स्थापना, कार्यपद्धती आणि उद्दिष्टे या बाबतीत निकिता तायडे यांनी माहिती दिली. यानिमित्ताने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर- फादर ऑफ मॉडर्न इंडिया’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात ओमन, कतार, बहरैन, सौदी अरेबिया, यू.ए.ई. आदी देशातील अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांनी भाग घेतला. निबंध स्पर्धेत प्रथम बक्षीस दुबई येथील मधोवर्षिनी राजेश आणि दुसरे बक्षीस बहरैन येथील इमानुएल जुदे यांनी पटकावली. यावेळी भारतीय समाज सुधारकांचा एकपात्री कार्यक्रम आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमात शाळकरी मुला-मुलींनी भाग घेतला. संचालन मोगल्लन भगत आणि करुणा सोनोने यांनी केले. आभार महेंद्र सोनवणे यांनी मानले.