दिलखेचक जाहिरात बनवणे हे अव्हान आहे. त्यातही ‘राज’कीय पक्षांच्या निवडणूक जाहिराती बनवणे ही वेगळीच कला आहे. नेमक्या शब्दात आशय मांडणे आणि त्याची चित्राशी संगड घालत लाखो मतदारांना आकर्षित करण्याचे आव्हान पेलण्यात एक वेगळीच मजा असते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘बाळ केशव ठाकरे’ या फोटोग्राफी पुस्तकाचे मुखपृष्ठ तसेच त्यातील छायाचित्रांची मांडणी वेधक जशी वेधक ठरली तशीच ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्रा माझा’ या घोषणेपासून ते ‘हो हे शक्य आहे’ या आताच्या निवडणुकीतील मनसेची जाहिरात लक्षवेधी ठरली आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून अ‍ॅप्लाईड आर्टस्ची पदवी घेणारे विलास साळुंखे या तरुणाचा मनसेच्या प्रचारातंत्रात मोलाचा सहभाग आहे.
राज ठाकरे यांच्याबरोबर जे.जे.पासूनच संपर्कात असलेल्या विलास साळुंखे यांनी वेगवेगळ्या प्रतिथयश जाहिरात कंपन्यांमध्ये काम केले आहे. जे.जे.मधील पदवीप्रमाणेच पत्रकारितेतील पदविका आणि छायात्रिणकलेत सुवर्णपदक पटकाविलेल्या विलास यांच्यातील गुण ओळखून राज यांनी शिवसेनाप्रमुखांच्या फोटोबायोग्राफीच्या पुस्तकाचे काम त्यांच्यावर सोपविले. राज ठाकरे यांच्याबरोबर काम करणे हे एक आव्हान असल्याचे सांगून विलास म्हणाले, राज हे स्वत: कलावंत व व्यंगचित्रकार आहेत. त्यांच्याकडेही जाहिरातीची दृष्टी आहे. त्यामुळे राज यांच्यासाठी काम करण्यात एक वेगळीच मजा येते, असे साळुंखे यांनी सांगितले. बाळासाहेबांवरील फोटोबायोग्राफी तयार करताना बाळासाहेबांच्या अक्षरश: हजारो फोटोंची छाननी करण्यात आली. त्यातून फोटो निवडण्याचे काम, पुस्तकाच्या आकारापासून नेमके त्याचे स्वरूप कसे असावे अशा अनेक कल्पना राज यांनी मांडल्या होत्या.
जे.जे. कला महाविद्यालयात असताना जीएसच्या निवडणुकीसाठी जी पोस्टर्स मी बनवली होती ती त्यावेळी मुंबईच्या भेटीवर आलेल्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दृष्टीस पडली. त्यांनी मला बोलावून घेऊन चार दिवस चर्चा केली. काँग्रेससाठी काम करशील का, तसेच विधानसभा लढण्याची ऑफरही त्यांनी दिली होती. प्रत्यक्ष राजकारणात येण्याची आवड मला नसल्याचे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आग्रह केला नाही. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या वंसतदादांनी मला बोलावून काँग्रेससाठी काही जाहिराती बनविण्याची जबाबदारी दिली होती. काँग्रेसच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांसाठी जाहिराती बनविण्याचे काम मी केले आहे. राष्ट्रवादीच्याही एका मोठय़ा नेत्याने शहरी आणि ग्रामीण भागाचा विचार करून कोणत्या संकल्पनांवर काम करता येईल, याच्यासाठी माझ्याशी चर्चा केली आहे. माझ्या कल्पना त्यांना आवडल्या होत्या. त्यानुसार काम करण्याचेही ठरले परंतु मधेच माशी शिंकली..राजकारण्यांपासून वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादनांसाठी अनेक जाहिरात संकल्पना तयार करण्यापासून सर्व जबादारी मी पेलली आहे. तथापि राज ठाकरे यांच्याबरोबर काम करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. ते स्वत:कलावंत असल्यामुळे संकल्पनेपासून मांडणीपर्यंत वेगवेगळ्या मुद्दय़ांवर सखोल चर्चा होऊन अंतिम रूप तयार होत असते. त्यातून बाळासाहेबांची फोटोबायोग्राफी ते राज यांच्या ‘ब्लू प्रिंट’ची पुस्तिका कमालीच्या उत्कटतेने बनवू शकलो असेही विलास साळुंखे यांनी सांगितले.