मलबार हिल परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेला ‘बाणगंगा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ मे महिन्यात सुरू होत आहे. मात्र दररोज सुमारे १५ लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या केंद्रातील पाण्याचे वितरण कसे करायचे हा यक्षप्रक्ष पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर आहे. एवढय़ा प्रचंड पाण्याची वाहतूक टँकरद्वारे करणे अशक्य असून या परिसरात जलवाहिन्या टाकण्याचे काम जिकिरीचे ठरणार आहे.
शहरातून दररोज लाखो दशलक्ष लिटर सांडपाणी समुद्रात सोडले जाते. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्याव्यतिरिक्तच्या उपयोगासाठी – कार धुण्यासाठी, झाडांसाठी, शौचालयासाठी- वापरता येऊ शकते. पालिकेने यापूर्वी वरळी येथे लव्हग्रोव्ह व कुलाबा येथे सांडपाण्यावरील प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. त्यात अनुक्रमे ३० लाख लिटर व ५० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. अशाच प्रकारचे केंद्र बाणगंगा येथे उभारण्यात आले आहे. राजभवन आणि प्रियदर्शिनी पार्क यादरम्यान असलेल्या या केंद्रात ‘रोटेटिंग मीडिया मूव्हिंग बेड’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
तीन युनिटच्या या केंद्रात दररोज सुमारे १५ लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. यातील एक युनिटचे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाले आहे. उर्वरित दोन युनिट एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ात कार्यरत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात हे केंद्र संपूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या केंद्रातून मिळणाऱ्या पाण्याचे वितरण कसे करायचे हा मुख्य प्रश्न आहे.
सुरुवातीला कमला नेहरू पार्क, प्रियदर्शिनी पार्क व राजभवनमध्ये हे पाणी टँकरने पुरवण्याचा विचार आहे. मात्र तरीही भरपूर पाणी उरणार आहे. परिसरातील सोसायटय़ांनी शौचालय तसेच उद्यानासाठी पाणी घेणार असल्याचे कळवले आहे. मात्र एक टँकर सुमारे दहा हजार लिटर पाणी वाहू शकत असला तर १५ लाख लिटर पाण्यासाठी दिवसाला टँकरच्या १५०० फेऱ्या करणे अव्यवहार्य आहे. जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होऊ शकेल. मात्र ते काम जल अभियंता विभागाकडून होणे आवश्यक आहे. तशी विनंती आयुक्तांमार्फत जल अभियंता विभागाला करण्यात आली आहे. मात्र मलबार हिलच्या परिसरात जलवाहिन्या टाकण्याचे काम जिकिरीचे आहे, अशी माहिती मलनिसारण प्रचालनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बाणगंगा प्रकल्पात कमी खर्चाचे नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. सुरुवातीला टँकरच्या साहाय्याने राजभवन, कमला नेहरू पार्क, प्रियदर्शिनी पार्क या ठिकाणी झाडांसाठी पाणी दिले जाईल. मलबार हिल परिसरातील सोसायटय़ांमध्येही जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी सहा महिने लागतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी दिली.

एक हजार लिटर पाण्यासाठी दहा रुपये?
लव्हग्रोव्ह सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून तयार होणारे पाणी वेलिंग्टन क्लबला दिले जाते. या पाण्याचा दर १२ रुपये प्रतिहजार लिटर असा ठेवण्यात आला आहे. त्यात जलवाहिनी टाकण्याचा खर्च अंतर्भूत आहे. बाणगंगा येथील प्रकल्पातून स्वच्छ होणाऱ्या पाण्याचा खर्च दर हजार लिटरमागे ३.४० रुपये येईल. टँकरने हे पाणी दिल्यास त्यासाठी पाच ते सहा रुपये शुल्क आकारण्यात येऊ शकते. मात्र जलवाहिन्यांचा खर्च लक्षात घेता या पाण्याचा खर्च दर हजार लिटरमागे दहा रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.