सिडकोने रो हाऊसच्या तळमजल्यामध्ये पार्किंगसाठी जागा दिलेली असताना त्या जागेत बेकायदा बिर्याणीचे दुकान थाटण्याचा प्रकार ऐरोली येथे घडला असल्याचे उघडकीस आले आहे. या बिर्याणीच्या दुकानातील टाकाऊ कचऱ्याच्या दरुगधीने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
 नवी मुंबईतील बहुतेक ठिकाणी रो हाऊसमधील तळमजल्यामध्ये वाहनतळासाठी जागा दिली असतानाही त्या जागेचा वापर दुकानांसाठी केला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. ऐरोली सेक्टर ४ येथील दिशा रो हाऊस ओनर्स असोसिएशनमधील एका रो हाऊसमध्ये वाहनतळाच्या जागेवर गेल्या १४ वर्षांपासून बेकायदा बिस्मिल्ला बिर्याणीचे दुकान सुरू आहे. या दुकानाचा टाकाऊ कचरा तसेच अत्रपदार्थ रो-हाऊसच्या मलवाहिनीत टाकले जात असल्याने मलवाहिनी तुंबली आहे. त्यामुळे मलवाहिनीतून दरुगधी येण्यास सुरू झाली आहे. या मलवाहिनीचे सांडपाणी रहिवाशांच्या रो हाऊसमध्ये येत असल्याने रहिवाशांना नाक मुठीत धरण्याची वेळ आली आहे. दुकानातून विकत घेण्यात येणारे चिकन खाऊन झाल्यानंतर ग्राहक तिथेच कचरा टाकत असतात. तसेच काही मद्यपी या ठिकाणी मद्यपान करत असतात, असा आरोप असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे.  त्यामुळे कुत्र्याची संख्याही या ठिकाणी वाढली असून डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे. वाहनतळात दुकान सुरू असल्यामुळे रहिवाशांना त्यांची वाहने उभे करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.  रो हाऊससमोरदेखील वाहने उभी केली जात असल्याने रहिवांशाना त्यांचे वाहन काढणेही जिकिरीचे होत आहे.  
 रो हाऊसचे मालक साळस्कर यांच्याकडे  वारंवार दिशा रो हाऊस ओनर्स असोसिएशनने तक्रार करूनदेखील ते लक्ष देत नसल्याने अखेर नाइलाजास्तव असोसिएशनने रबाले पोलीस स्टेशन व नवी मुंबई महानगरपालिका जी विभाग कार्यालयाला या दुकानावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार केली आहे. या संदर्भात बिस्मिल्ला बिर्याणी शॉप यांच्या मालकांशी संपर्क होऊ शकला नाही.

बिस्मिल्ला बिर्याणी दुकानामुळे तेथील रहिवांशाना त्रास होत असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिका मुख्य परवाना अधिकारी यांच्याकडे पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच बिस्मिल्ला बिर्याणी दुकान हे अनधिकृपणे सुरू असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल.   
    -राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी,     नवी मुंबई महानगरपालिका