एका तरुण विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या टिटवाळा रेल्वे दुर्घटनेचा अहवाल अद्यापही रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सादर केला नसल्याचे स्पष्ट होत आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात दोन डब्यांना जोडणाऱ्या कपलिंगमधील बिघाडामुळे झाल्याचे समजत होते. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मध्य रेल्वेला आपल्या सर्वच उपनगरी गाडय़ांच्या डब्यांचे कपलिंग तपासून बदलण्याची सूचना पत्राद्वारे केली होती. मात्र हे पत्र पाठवूनही आता सात महिने उलटत आले, तरीही मध्य रेल्वेने याबाबतच्या कार्यवाहीचे पत्र सुरक्षा आयुक्तांना पाठवलेले नाही. आता रेल्वे सुरक्षा आयुक्त येत्या महिनाभरात हा अहवाल सादर करणार आहेत. दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने उपनगरी गाडीचे पाच डबे २० मार्च रोजी टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ रुळांवरून घसरले होते. या अपघातात घाटकोपर येथील मयूर लोढाया (२०) या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर आठवडाभरातच मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी प्रशासनाला त्यांच्या ताफ्यातील सर्व उपनगरी गाडय़ांच्या कपलिंगची तपासणी करण्यासंबंधी सूचना करणारे पत्र लिहिले होते. मध्य रेल्वेच्या ताफ्यातील सर्वच गाडय़ांच्या सर्व डब्यांचे कपलिंग तपासण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. आता सात महिने उलटूनही या अपघाताबाबतचा अहवाल बक्षी यांनी सादर झालेला नाही.
हा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. कपलिंगमधील बिघाडामुळेच हा अपघात घडला होता, हे स्पष्ट आहे. मात्र कपलिंगमध्ये आधीपासूनच बिघाड होता की कपलिंग निकृष्ट दर्जाचेच होते, या सर्वच गोष्टी हा अहवाल सादर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत, असे बक्षी यांनी सांगितले. मात्र मध्य रेल्वेने त्यांच्या ताफ्यातील इतर गाडय़ांचे कपलिंग तपासले की नाही, याबाबत आपल्याला अद्यापही कळवण्यात आले नसल्याचे बक्षी यांनी स्पष्ट केले. याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असला संपर्क होऊ शकला नाही.