दूषित पाणीपुरवठय़ाला कारणीभूत ठरणारी पर्जन्य जलवाहिनीतून गेलेली जलवाहिनी वेगळी करण्यास कंत्राटदार नकारघंटा वाजवीत आहे. तर दुसरीकडे जलवाहिनी वेगळी करण्यात येणार असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. परंतु पर्जन्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच संपुष्टात येणार असून ही जलवाहिनी पर्जन्य जलवाहिनीतच अडकली, तर भविष्यातही मरोळ-मरोशी आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना दूषित पाणीपुरवठय़ाचा सामना करावा लागणार आहे.
पर्जन्य जलवाहिनीच्या दुरुस्तीदरम्यान त्यातून गेलेल्या जलवाहिनीस हात लावण्यास कंत्राटदार तयार नसल्याने मरोळ-मरोशी आणि आसपासच्या रहिवाशांना भविष्यातही दूषित पाणीपुरवठय़ाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. मात्र पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती करताना जलवाहिनी वेगळी करण्यात येईल, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ने २००४ मध्ये मरोळ-मरोशी रोडवर पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभे केले. मात्र त्यानंतरच्या काळात हळूहळू या परिसरात विकास होत गेला आणि पाण्याची मागणी वाढली. परिणामी या परिसरातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने जलवाहिन्यांचे जाळेही विस्तृत केले. मात्र एमएमआरडीएमार्फत पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारताना तीन ठिकाणी जलवाहिन्या आड आल्या. त्यामुळे जलवाहिन्यांना सामावून पर्जन्य जलवाहिनी टाकण्याची शक्कल कंत्राटदाराने लढविली. मात्र त्यामुळे पावसाळ्यात अधूनमधून नागरिकांना दूषित पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. दरम्यानच्या काळात जुन्या पर्जन्य जलवाहिन्या खराब झाल्यामुळे आता पालिकेने तेथे नवीन पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन जल विभागानेही मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. पर्जन्य जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर मरोळ-मरोशी रस्त्याखालील उपयोगिता वाहिन्यांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्याचाही पालिकेचा मानस आहे. त्यामुळे सध्या येथे जोमाने काम सुरू आहे. परंतु पर्जन्य जलवाहिनीचे काम करताना जलवाहिनीला धक्का बसून काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र कंत्राटदाराने जलवाहिनीच्या दुरुस्तीस नकार दिल्यामुळे गेले काही दिवस दूषित पाणीपुरवठय़ाचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत होता.
पावसाळा जवळ येत आहे. परंतु ही कामे वेगाने होताना दिसत नाहीत. पर्जन्य जलवाहिनीचे काम योग्य पद्धतीने आणि वेगाने केल्यास पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका टळू शकेल. तसेच पर्जन्य जलवाहिन्यांमधूनच गेलेल्या जलवाहिन्यांमुळे दूषित पाणीपुरवठय़ाचा प्रश्न गेली अनेक वर्षे मरोळ-मरोशी रोडवरील रहिवाशांना भेडसावत आहे. आता पालिकेने कामे हाती घेतल्यामुळे पर्जन्य जलवाहिनीत अडकलेल्या  जलवाहिनीला मुक्ती मिळेल असा रहिवाशांना आशावाद दिसत होता. मात्र कंत्राटदार या कामाला हात लावण्यास तयार नाही. मग कोटय़वधी रुपये खर्च करून दूषित पाण्याचा प्रश्न कायम राहणार असेल, तर ही कामे हाती घेण्यात काय अर्थ आहे, असा सवाल या भागातील समाजसेवक अजिज अमरेलीवाला यांनी केला आहे. पर्जन्य जलवाहिनी बसविण्याचे काम पालिकेने एका कंत्राटदाराला दिले आहे. परंतु कंत्राटदाराने हे काम उपकंत्राटदाराला दिले आहे. हा उपकंत्राटदार पर्जन्य जलवाहिनीतून गेलेली जलवाहिनी वेगळी करण्यास तयार नाही, असा आरोप अजिज अमरेलीवाला यांनी केला आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून ही जलवाहिनी पर्जन्य जलवाहिनीतच आहे. आता आम्ही ती वेगळी करणार आहोत, असे पर्जन्य जलवाहिनी विभागाचे उपप्रमुख अभियंता आनंद खाणकर यांनी सांगितले.