शहराच्या सांस्कृतिक कलावैभवातील एक देखणी वास्तू असलेल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाकडे सांस्कृतिक मंत्र्यांसह जिल्हा प्रशासन, नाटय़गृह समिती तसेच सांस्कृतिक, नाटय़ व कला क्षेत्रातील कलावंतांचे दुर्लक्ष झाल्याने या सभागृहाला आता अवकळा आली आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातील वैभव म्हणून प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाकडे बघितल्या जाते. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे शासन असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून २००१ मध्ये या सांस्कृतिक सभागृहाची वास्तू उभी राहिली. आज या वास्तूला १३ वष्रे पूर्ण झाले परंतु सांस्कृतिक मंत्री तसेच या जिल्हय़ाचे पालकमंत्री संजय देवतळे, जिल्हा प्रशासन व इंदिरा गांधी नाटय़गृह समितीचे याकडे दुर्लक्ष झाल्याने आता या सभागृहाची स्थिती अतिशय वाईट झालेली आहे. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात प्रियदर्शनी चौकातच ही वास्तू उभी आहे. या सांस्कृतिक सभागृहात विविध प्रायोजिक नाटक, सांस्कृतिक व शासकीय विभागाचे कार्यक्रम घेतले जातात. स्थानिक कलावंतांच्या कार्यक्रमासाठी भाडय़ात सूट दिली जाते. परंतु या सभागृहातील आसन व्यवस्था, साऊंड सिस्टीम निकामी झाली आहे. येथे एखादा कार्यक्रमाही घ्यायचे झाले तर बाहेरची साऊंड सिस्टीम भाडेतत्वावर बोलवावी लागते. लाईटींग व्यवस्थेलासुध्दा अखेरची घरघर लागली आहे.
 एखादे प्रायोगिक किंवा व्यावसायिक नाटकसुध्दा या सभागृहात घ्यायचे म्हटले तर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या सभागृहाची आसन व्यवस्था ९५० खुच्र्याची आहे. पहिली रांग तर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व नाटय़ गृह समितीसाठी आरक्षित आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने गेल्या दहा वषार्ंत या सभागृहाची साधी रंगरंगोटी सुध्दा केलेली नाही. अनेक वर्षांपूर्वी बांधलेले हे सभागृह आता मात्र कालबाह्य़ झालेले आहेत. त्याच्या नूतनीकरणासाठी शासनाने निधी उपलब्ध करून घ्यायला हवा. जिल्हय़ाचे पालकमंत्री संजय देवतळे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री असून देखील कुठल्याही पद्धतीचे मागील चार वर्षांत जिल्हय़ाच्या सांस्कृतिक क्षेत्राला चालणा देणारे कार्य झाले नाही. तर कृपया त्यांनी स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा सांस्कृतिक सभागृहाचे पालकत्व घेऊन या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी विशेष निधी सांस्कृतिक खात्याकडून मिळवून घ्यावा त्यासोबतच येथे चांगली ध्वनी प्रक्षेपण, वातानुकूलित सुंदर बगिचा व दर्जेदार आसनाची व्यवस्था करावी. परंतु पालकमंत्री देवतळे यांनी तसे कुठलेही प्रयत्न केलेले नाही. जिल्हा प्रशासनाचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाले आहे. नाटय़गृह समिती तर केवळ समोरच्या रांगेतील पासेस मिळावेत यापलिकडे दुसऱ्या कुठल्याही कामाची नाही. या सभागृहासाठी येथे व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक व लाईटमन आहे. परंतु एखाद्या कार्यक्रमा झाला तर त्याचेकडून बक्षीस मिळविण्यातच हा सर्व अस्थायी कामगार वर्ग सक्रिय असतो. साऊंड सिस्टीम खराब आहे. शेवटच्या प्रेक्षकापर्यंत आवाज सुध्दा पोहचत नाही.
सभागृहात आणखी एक छोटे सभागृह आहे. या सभागृहात कायम सेल लागलेला असतो. तिथे एखादा कार्यक्रम सुध्दा घ्यायचा असेल तर तो अन्य कुणाला दिल्या जात नाही. या सभागृहाला असंख्य समस्यांनी ग्रासले असून किमान सांस्कृतिक मंत्र्यांनी या समस्यांची दखल घेऊन तातडीने काम सुरू करावे अशी मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा मांनी केली आहे. सांस्कृतिक सभागृहाच्या वास्तूची देखभाल व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी ही सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कलावंतांची असते. परंतु येथील सांस्कृतिक व नाटय़ संस्थांचे पदाधिकारी केवळ आम्हीच नाटय़ व सांस्कृतिक क्षेत्रातील खरे पाईक आहोत अशा थाटात केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत.