वर्षअखेरीस सुरू झालेल्या कृषीमालाच्या स्वस्ताईने कधी नव्हे ते नव्या वर्षांतही ग्राहकांना दिलासा दिला असून गेल्या वर्षी गगनाला भिडलेले कांदा, टॉमेटो, भेंडी, हिरवा मसाला अशा सर्वच भाज्यांचे दर मोठय़ा प्रमाणावर कमी झाल्याने महागाईने पिचलेल्या ग्राहकांसाठी वर्षांरंभ खुशीचा ठरू लागला आहे. गेल्या १५ दिवसांत ऊत्तम प्रतीच्या टॉमेटोचे दर घाऊक बाजारात किलोमागे ५० रुपयांपासून थेट सहा रुपयांपर्यत खाली ऊतरले आहेत. पंधरवडय़ात टॉमेटोच्या दरात किलोमागे तब्बल ३५ रुपयांची घरसण झाल्याने व्यापारीही अवाक झाले असून वाशीच्या घाऊक बाजारात स्वस्ताईचा माहोल अवतरला आहे. विशेष म्हणजे, एरवी घाऊक बाजारात दर वाढताच सर्वसामान्यांचा खिसा कापण्यात आघाडीवर असणाऱ्या किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर मोठय़ा प्रमाणावर कमी झाल्याचे चित्र दिसू लागले असून त्यामुळे भाज्यांचा स्वस्त हंगाम थेट सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहचला आहे.
पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून मुंबईच्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर भाज्यांची आवक होत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील भाज्यांचा बाजारभाव हा पुणे, नाशिकच्या बाजारपेठेवर अवलंबून असतो. मागील पंधरवडय़ापासून या दोन्ही जिल्ह्य़ांमधून मुंबईत येणाऱ्या भाज्यांचा दर्जाही चांगला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच भाज्यांचे दर अध्र्यावर आल्याचे चित्र दिसू लागले आहे. गेले संपूर्ण वर्ष सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे दरही आता आवाक्यात आले आहेत. मुंबई कृषी ऊत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशीच्या घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा अवघ्या १० रुपयांनी विकला जाऊ लागला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, डोंबिवलीच्या किरकोळ बाजारात कांद्याचे भाव आता किलोमागे २० ते २५ रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत.
स्वस्ताईची दुलई
मागील वर्षी जवळपास सर्वच कृषीमालाचे दर चढे राहिले. जून महिन्याच्या सुरुवातीस गगनाला भिडलेले कांद्याचे दर वर्षअखेपर्यंत खाली उतरलेच नाहीत. आलं, कोिथबीर, हिरव्या मिरच्या यासारखा हिरवा मसालाही महाग राहिला. टॉमेटो, वाटाणा, भेंडी यासारख्या भाज्यांनी नेहमीच पन्नाशी ओलांडत ग्राहकांना हैराण केले. त्यामुळे महागाईत जमा-खर्चाचे गणित जमविताना सर्वसामान्यांच्या अक्षरश: नाकीनऊ आले. वर्ष संपता संपता हे चित्र काही प्रमाणात बदलू लागले. डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांमध्ये पुणे आणि नाशिक जिल्ह्य़ात भाज्यांचे पीक चांगले असते, असा अनुभव आहे. त्यामुळे या काळात भाज्यांचे दर कमी होतात. असे असले तरी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाची स्वस्ताई नजरेत भरणारी आहे, असा दावा एपीएमसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तान्तसोबत बोलताना केला. वाशीतील घाऊक बाजारात भेंडी (१६ रुपये), दुधी भोपळा ( ८ ते १४), फरसबी (२८), गाजर ( १०), गव्हार (३० ते ४५), काकडी ( १६ ते २८), टॉमेटो ( ६ ते १०) अशा सर्वच भाज्यांचे दर कमी झाले आहेत. किरकोळ बाजारातही टॉमेटो (२० ते २५), वाटाणा (२० ते ३०), भेंडी (४०) रुपयांनी मिळू लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ बाजारात प्रमुख भाज्यांचा ६० रुपये किलो या दराचा घाऊक पॅटर्न सुरू झाला होता. नव्या वर्षांत प्रथमच ‘फिक्स रेट’चा हा पॅटर्न मोडीत निघाला आहे.