वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्राच्या उद्घाटनासाठी दिवस निश्चित केलेल्या मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वेळ न दिल्याने उद्घाटनासाठी केलेली सर्व तयारी पाण्यात गेली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयाने शेवटच्या क्षणापर्यंत सिडको प्रशासनाला अंधारात ठेवले. त्यामुळे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी मंगळवारी थेट मुख्यमंत्र्यांना गाठल्याचे समजते.
सिडकोच्या वतीने राज्यातील पहिले शासकीय प्रदर्शन केंद्र उभारण्यात आले आहे. सुमारे २५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रदर्शन केंद्रात उद्योग केंद्रदेखील आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या भव्य प्रदर्शन केंद्राचे लोकार्पण व्हावे यासाठी सिडको प्रयत्नशील आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने सोमवारची तारीख दिली होती पण वेळ रात्री आठ वाजता सांगण्यात येईल, असे कळविण्यात आले होते. त्यानुसार सिडको प्रशासनाने सर्व तयारी केली होती. यात निमंत्रण प्रत्रिकादेखील छापण्यात आल्या होत्या, पण मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरापर्यंत वेळ न कळविल्याने हा सर्व खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी मंगळवारी मुख्यमंत्री चव्हाण यांना गाठल्याचे समजते.
हे प्रदर्शन केंद्र गेली दोन महिने बांधून तयार आहे. त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त मात्र अद्याप निश्चित होत नाही. तीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या या केंद्राला पाच वर्षे लागली, त्यामुळे खर्च वाढला. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला गेला. भाडेपट्टय़ासाठी निविदा काढण्यात आली तर त्यात एकाच निविदाकाराने भाग घेतला.
अशा अनेक अडचणींनंतर आता या केंद्राच्या उद्घाटनाचा लंपडाव सुरू आहे. भाटिया आणि अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या आग्रहास्तव या आठवडय़ात हे उद्घाटन आटपून घेतले जाणार आहे.
या कार्यक्रमाला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या वतीने नेरुळ येथे बांधण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाच्या कामाचा शुभारंभदेखील केला जाणार आहे.