विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकत्र निवडणूक लढण्याच्या निर्णयावर सध्या केंद्र आणि राज्य पातळीवर अंतिम चर्चा सुरू असताना जिल्ह्य़ात आणि शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुक दावेदारांना अर्ज वाटप सुरू केल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. काँग्रेस शहरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकही जागा सोडायला तयार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तर किमान तीन जागा मिळाव्या अशी मागणी केली आहे त्यामुळे आघाडीमध्ये उमेदवारीवरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दावेदारांची यावेळी संख्या वाढली आहे. ‘अभी नही तो कभी नही’ असे सांगत दोन्ही पक्षाचे अनेक पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहे. मुंबईमध्ये काँग्रेसमधील इच्छुक दावेदारांच्या मुलाखती नुकत्याच आटोपल्या असून जिल्हा आणि शहर मिळून ११० दावेदारांनी मुलाखती दिल्या आहे. काटोल आणि हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असताना त्या मतदारसंघातून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुलाखती दिल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी पाच हजार रुपये घेऊन इच्छुक दावेदारांचे अर्ज दिले आहे. शहरामध्ये पूर्व, उत्तर, पश्चिम, दक्षिण पश्चिम, मध्य आणि दक्षिण नागपूर असे सहा मतदारसंघ आहेत तर जिल्ह्यात काटोल, हिंगणा, उमरेड, सावनेर, रामटेक, कामठी मतदारसंघ आहेत. जुन्या फार्मुल्यानुसार जिल्ह्य़ात हिंगणा आणि काटोल हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत तर शहरात एकही नाही. मात्र, राष्ट्रवादीने शहरातील सहा मतदारसंघातून इच्छुक दावेदारांना अर्ज देऊन त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आल्याचे बोलले जात आहे. शहरातील सहा जागांवर राष्ट्रवादीकडून ३६ पदाधिकाऱ्यांनी दावे केले आहेत. सर्वाधिक अर्ज पश्चिम नागपुरातून आहे. त्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख, शहर अध्यक्ष अजय पाटील, प्रगती पाटील, वेदप्रकाश आर्य, विजय तालेवार, गंगाप्रसाद ग्वालबंशी व योगेश मेश्राम यांचा समावेश आहे. पूर्व नागपुरातून नगरसेवक दुनेश्वर पेठे, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, दक्षिणमधून सुनील राऊत, नगरसेवक राजू नागुलवार, उत्तरमधून रमेश फुले, महेंद्र भांगे, शरद नागदिवे, मध्य नागपूरमधून रमण ठवकर, अनिल अहिरकर, योगेश कुंभलकर बबीता मेहर आदी पदाधिकाऱ्यांनी दावे केले. सर्व अर्ज मुंबईला पाठविण्यात आले असून मुंबईला त्यांच्या मुलाखती होणार आहे.
दुसरीकडे काँग्रेसने १२ मतदारसंघातील इच्छुक दावेदारांच्या मुलाखती घेतल्या असून त्यातील अनेक दावेदारांनी ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची मानसिकता अनेकांनी केल्यामुळे या काँग्रेससमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पश्चिम नागपूरमधून राजेंद्र मुळक तर दक्षिण पश्चिममधून प्रफुल्ल गुडधे पाटील प्रबळ दावेदार आहे. शहर अध्यक्ष विकास ठाकरे पश्चिममध्ये प्रबळ दावेदार आहे त्यामुळे मुळक की ठाकरे याबाबत पक्षामध्ये चांगलीच कसरत आहे. ठाकरे हे विलास मुत्तेमवारांचे तर राजेंद्र मुळक हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक आहेत त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.