पारधी समाजातील भास्कर भोसले यांनी लिहिलेल्या पारधी समाजाच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या ‘दैना’ या कादंबरीच्या २१ व्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि भास्कर भोसले यांच्या मातोश्री शेवराई यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांचा फायदा पारधी समाजाने करून घ्यावा. पारधी समाजाने समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. तसेच या समाजातील प्रत्येकाने आपल्या मुलांना शिकवावे आणि मोठे करावे, असे आवाहन प्रतिभा पाटील यांनी केले. तर शेवराई भोसले यांनी सांगितले की, मी माझ्या मुलांना शिकविले. मोठे केले.
 पैशांच्या मागे न लागता नाव कमवा. पैशामुळे माणूस दुरावतो, नाव कमाविल्यावर माणूस माणसाला जोडला जातो, अशी शिकवण त्यांना दिली. कार्यक्रमास भास्कर भोसले यांचे भाऊ नामदेव, वडील ज्ञानदेव भोसले आदी उपस्थित होते.