कल्याण डोंबिवली पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य वामन म्हात्रे यांच्या विषयी शासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारींवरून उपलोकायुक्त आणि ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडे त्यांच्या जमिन टीडीआर प्रकरणांची, पालिकेच्या सेवेत असलेल्या नातेवाईकांची माहिती मागवली आहे. माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी शासनाकडे वामन म्हात्रे यांच्या जमिन टीडीआर प्रकरणाची तक्रार शासनाकडे केली होती. त्याची दखल घेत उपलोकायुक्त कार्यालयातील कक्ष अधिकारी नं. रा. शिरोडकर यांनी पालिकेला पत्र पाठवून या तक्रारी संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अशाच प्रकारची एक तक्रार ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली आहे. या तक्रारींवरून उपअधीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांनी पालिकेला पत्र पाठवून म्हात्रे यांच्या जमिनीबाबत, पालिकेच्या सेवेत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांची माहिती मागवली आहे. या संदर्भात नगरसेवक वामन म्हात्रे यांनी सांगितले, ‘गेल्या काही वर्षांपासून प्रतिस्पर्धी आपणास नाहक त्रास देऊन आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वीच आपण सर्व चौकशी यंत्रणांना कागदोपत्री माहिती दिली आहे. त्यामधून काही निष्पन्न होत नसल्याने आपणास, कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे’.