जिल्ह्य़ात डेंग्यूने पाच लोकांचा मृत्यू झाला असून २९० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ताप, मलेरिया, व्हायरल फीवरचे ४०० रुग्ण भरती आहेत. तर गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयात १२५ तापाचे रुग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यूचे पाच रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. तापाची साथ लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हय़ात पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. त्यामुळे हवामान एकदम बदल झाला असून पावसाळय़ात कडक उन्हाळय़ासारखे वातावरण आहे. त्याचा परिणाम डेंग्यू, व्हायरल फीवर, ताप व मलेरियाची साथ सुरू झाली आहे. जिल्हय़ातील गोंडपिंपरी तालुक्यातील चकपिरंजी या गावी सर्वप्रथम डेंग्यूची साथ आली. जिल्हा आरोग्य विभागाला या साथीची माहिती मिळताच तिथे शिबीर उघडले असता चकपिरंजी, चक बोरगाव, विठ्ठलवाडा व दरूर या चार गावांमध्ये तापाचे शेकडो रुग्ण मिळाले. यातील बहुतांश रुग्णांची डेंग्यूची तपासणी केली असता असंख्य रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. तेथील दोघांची प्रकृती अचानक खालीवली असता त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर अवघ्या चोवीस तासात त्यांचा मृत्यू झाला. तर गोंडपिंपरीत उपचार सुरू असलेल्या मीरा तुकाराम कुबडे (४०) व सुमन तुकाराम खारकर (५०) यांचा मृत्यू झाला. गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयात १२५ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वाना ताप व डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोगुलवार यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. गाव सफाईकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असले तरी नमूने पॉझिटिव्ह निघत असल्याचे त्यांनी मान्य केले.
 जिल्हा सामान्य रूग्णालयात तब्बल ४०० रुग्ण उपचार घेत आहेत. जवळपास ११० रुग्णांना जिल्हा रुग्णालयात बेड मिळू न शकल्याने खाली गाद्या टाकून त्यांच्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी यू.व्ही. मुनघाटे यांनी दिली. गेल्या आठवडय़ात शहरातील एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शरद कल्लूरवार हा डेंग्यूचा रुग्ण दाखल झाला. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. रुग्ण अधिक आणि डॉक्टरांची संख्या कमी अशा स्थितीत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मुनघाटे यांनी काही डॉक्टरांना पाचारण केले असल्याची माहिती दिली.
 परंतु ते अजूनही रूजू झालेले नाहीत. सध्या केवळ एक डॉक्टर असून तो ही चोवीस तास सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे आणखी दोन अतिरिक्त डॉक्टर देण्यात यावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे डॉ.मुनघाटे यांचे म्हणणे आहे. तब्बल ५२ रक्तनमून्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉ. हजारे यांनी दिली.