मध्य रेल्वेने गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या ९० विशेष गाडय़ांची घोषणा केली असली, तरी यापैकी एकाही गाडीला दिवा स्थानकात थांबा न देण्याचा परंपरागत वसा कायम ठेवला आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कल्याण, डोंबिवली पल्याडच्या अनेक प्रवाशांमध्ये असंतोषाची भावना आहे. मात्र या गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा दिल्यास गाडय़ांची धाववेळ वाढेल आणि त्याचा त्रास प्रवाशांनाच होईल, असा विचित्र युक्तिवाद मध्य रेल्वेतर्फे केला जात आहे.
गणेशोत्सवात चाकरमानी मुंबईकर कोकणात सुखरूप पोहोचावा, यासाठी मध्य रेल्वेने सोमवारी ९० विशेष गाडय़ा चालवण्याची घोषणा केली. लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या या ९० गाडय़ांपैकी कोल्हापूरच्या दोन गाडय़ा वगळता इतर सर्व गाडय़ा थेट कोकणात जाणाऱ्या आहेत. या गाडय़ांपैकी एकाही गाडीला दिवा स्थानकात थांबा दिलेला नाही. या सर्व गाडय़ा ठाण्याहून थेट पनवेलला थांबणार आहेत.
मध्य रेल्वेच्या या निर्णयाबाबत अनेक रेल्वे प्रवासी संघटना, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ, यांच्यासह अनेक प्रवासी नाराज आहेत. कोकणात जाणाऱ्या गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देण्यात यावा, ही या सर्वाचीच मागणी मध्य रेल्वेतर्फे पुन्हा एकदा फेटाळण्यात आली आहे. डोंबिवली, कल्याण आणि त्यापलीकडील लोकांना ठाण्याऐवजी दिव्याहून गाडी पकडणे सोयीचे आहे. दिव्याला थांबा दिल्यास ठाण्यावरील गर्दीचा भार कमी होतो आणि त्याचा फायदा प्रवाशांनाच होतो. दिवा स्थानकात गाडी थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मचीही सोय आहे. हा प्लॅटफॉर्म मुख्य मार्गापासून वेगळा असल्याने त्याचा परिणाम इतर वाहतुकीवर होत नाही. असे असूनही दिव्याला सातत्याने डावलून मध्य रेल्वे प्रवाशांच्या भावनांचा अनादर करत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांना विचारले असता, दिवा स्थानकात थांबा देण्यास अडचण नाही. मात्र या थांब्यामुळे गाडीच्या एकूण धाववेळेत वाढ होते. गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. विशेष गाडय़ा चालवताना रेल्वेला मुख्य मार्ग, उपनगरीय गाडय़ा यांचेही वेळापत्रक सांभाळायचे आहे. त्यामुळे दिव्याला थांबा देण्याची मागणी तेवढी व्यवहार्य नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले. मात्र रेल्वेच्या या खुलाश्यावर प्रवासी नाराज आहेत.

धाववेळ अशी किती वाढेल?
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून कोकण रेल्वेमार्गावर जाण्यासाठी गाडीला दिवा येथे रुळ बदलावे लागतात. त्यासाठी अर्थातच गाडीचा वेग अगदी मंदावतो. त्याच वेळी ती सुमारे ४-५ मिनिटे दिवा स्थानकात थांबली तर गाडीची धाववेळ फारतर ८-१० मिनिटांनी वाढेल. मग एवढा उशीर झाल्यास प्रवाशांची काय तक्रार असू शकेल, असा प्रश्न अनेक प्रवाशांना पडला आहे.