खांदेश्वर शहर आणि नवीन पनवेल यांना जोडणारा उड्डाणपूल उतरल्यावर सेक्टर ५ येथे नवीन पनवेलकरांच्या स्वागतासाठी कचऱ्याचा ढिगारा नित्याचा झाला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे होणाऱ्या दरुगधीमुळे सेक्टर ५ आणि ७ येथील रहिवासी वैतागले आहेत. साहेब कचऱ्यापासून शहर मुक्त करा, अशी विनवणी रहिवासी करत आहेत.
सणासुदीच्या काळात आणि सार्वजनिक सुट्टीच्या वेळी कचरा ही सिडको वसाहतींची मुख्य समस्या बनली आहे. नवीन पनवेल सेक्टर ५ येथील कचऱ्याने भरलेली पेटी हे सिडकोच्या साफसफाईच्या कामकाजाचे उत्तम उदाहरण आहे. कचऱ्याचा हा ढिगारा नवीन पनवेल शहरात येताना शहराची ओळख पाहुण्यांना सांगून जातो. तसेच या कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून काही अंतरावर विठ्ठल घरत यांची पानाची गादी आहे. घरत यांनीही अनेकदा सिडकोच्या अधिकाऱ्यांना या ढिगाऱ्याची समस्या सांगितली.
मात्र कारवाई शून्य होत असल्याने रहिवाशांनी सिडकोदरबारी तक्रारी करण्याचे बंद केले आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाविषयीचे सांगितल्यावर घरत यांची पानाची गादी कशी बेकायदा फुटपाथवर लावली आहे याचा जाब सिडकोचे अधिकारी घरत यांना विचारतात. मात्र कचरापेटी दिसली की मुठीत नाक धरण्याशिवाय नवीन पनवेलकरांना पर्याय उरलेला नाही.