गॅस कंपन्यांनी लादलेल्या जाचक अटींच्या विरोधात विदर्भातील १५० गॅस वितरक उद्या, २५ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहे. या संपामुळे विदर्भात गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून ग्राहकांना आणखी एका समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स ऑफ इंडिया यांच्या आवाहनानुसार विदर्भातील वितरकांनी हा बेमुदत संप पुकारला आहे. गॅस कंपन्यांनी वितरकांवर जाचक अटी लादल्या आहेत. या अटींची पूर्तता करणे अशक्य असल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. अटींची पूर्तता न केल्यास वितरकांवर दंड आकारण्यात येणार आहे, तसेच कमिशन कपात करण्यात येणार आहे. वितरकांचा या अटींना विरोध आहे. अनुदान, विनाअनुदान आणि व्यापारी सिलिंडरच्या किंमतीमधील तफावत काळा बाजाराचे मुख्य कारण आहे. अशा स्थितीत एक किंमत ठेवावी, असा विचार पुढे येत आहे. गॅस सिलिंडर योग्य पद्धतीने बंद केले जात नसल्याने सिलिंडरमधून गॅस बाहेर पडतो. यातून अपघाताची शक्यता असतेच परंतु त्यास गॅस वितरकांना दोषी ठरवले जाते. एक वितरक सरासरी प्रति महिना ७ हजार गॅस सिलिंडरची विक्री करतो. या विक्रीतून खर्च निघत नाही. त्यामुळे नवीन वितरक नियुक्त करू नये, अशी वितरकांची मागणी आहे. या अटी रद्द कराव्यात यासाठी हा बेमुदत संप आयोजित करण्यात आल्याचे विदर्भ एलपीजी डिस्ट्रीब्युटर असोसिएशनचे अध्यक्ष एन.आर. रायपुरे यांनी म्हटले आहे.