टाकाऊ कचरा उघडय़ावर जाळल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात, अशा आशयाच्या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे ज्ञान नसल्याने अनेक नागरिक आणि सफाई कर्मचारी मोठय़ा प्रमाणावर टाकाऊ कचरा उघडय़ावर जाळतात. यामुळे त्यांच्यासोबतच वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे, असे वृत्त काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. ए.बी. चौधरी आणि न्या. पी.एन. देशमुख यांनी या वृत्ताची स्वतहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करवून घेतली. यासाठी अ‍ॅड. शशीभूषण वाहणे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. यावर २७ मार्चला अंतरिम आदेश देण्यात येणार आहे.
महापालिका सफाई कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील विविध भागांची सफाई करते. हे कर्मचारी कचरा गोळा करून त्या-त्या ठिकाणी जाळून विल्हेवाट लावतात. हा प्रकार रोज सकाळी घडत असतो. याशिवाय अनेक ठिकाणी नागरिक देखील टाकाऊ कचरा जाळतात. यामुळे परिसरातील हवा प्रदूर्षित होते आणि श्वसनाचे विकार होतात. कचरा जाळण्याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु स्थानिक प्रशासनाने दंड आकारण्यापलिकडे काहीही केलेले नाही.
महापालिकेचे सफाई कर्मचारी घनकचरा उघडय़ावर जाळण्यास जबाबदार असल्याचे मत सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, राजनगर यासारख्या वस्तीमधील नव्हेतर लकडगंजसारख्या जुन्या आणि दाट वस्तीत नागरिकांनी व्यक्त केले होते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहती आणि कधीकधी जीपीओच्या परिसरात देखील कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण आणि जाळण्याची प्रक्रिया अनियंत्रित पद्धतीने होत असते. अनेकदा तर झाडाजवळ कचरा जाळण्यात येतो. शहरात उघडय़ावर कचरा टाकण्यात येत असल्याने सर्वत्र दरुगधी पसरते. सफाई कर्मचारी कचऱ्यावर प्रक्रिया करू शकत नसल्याने जाळतात. यातून विषारी आणि दरुगधीयुक्त वायू निर्माण होतो. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा उघडय़ावर जाळण्यात येत असल्याने श्वसनाचे आजार होत आहेत. खोकला, अस्थमा आणि डोळ्यांची जळजळ होण्याच्या तक्रारी आहे. कचरापेटी मुक्त शहर असे बिरुद मिरवणाऱ्या नागपूर शहरातील सफाई कर्मचारी कचरा जाळत असल्याचे दिसून आले आहे. कचरा जाळल्याप्रकरणी अनेकदा सफाई कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई देखील झाली आहे. त्यांच्यावर ५०० रुपये आणि १००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

टाकाऊ कचरा म्हणून काय जाळावे आणि काय जाळू नये. याबद्दल जागरुकता नाही. यामुळे प्लॉस्टिक पासून ते जैव्यविघटक सारखे पदार्थ जाळले जातात. यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे नाक वाहणे, खोकला, डोळे येणे आणि अस्थमा आदी आजार उद्भवतात. अशा धुराच्या सतत संपर्काने फुफ्फुसाचे आजार होतात, असे डॉक्टरांनी नमूद केले.