गेल्या दोन वर्षांत महापालिकेने राबविलेल्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागासह रस्त्यांशेजारी लावण्यात आलेली झाडे जगवण्याकडे हवे तसे लक्ष देण्यात न आल्याने ६० टक्क्यांहून अधिक झाडे नष्ट झाली आहेत. त्यामुळे ‘हिरवे नागपूर’ हे बिरुद मिरवणाऱ्या उपराजधानीत तूर्तास तरी ते केवळ कागदावर असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेतर्फे तत्कालिन महापौर अनिल सोले यांच्या कार्यकाळात मोठय़ा प्रमाणात लोकसहभागातून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली होती. त्यासाठी विविध सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी संघटनांची मदत घेण्यात आली होती. शहरातील विविध भागात १ लाखापेक्षा जास्त झाडे लावली असल्याचा दावा केला असताना आज मात्र त्यातील ६० टक्के झाडे दिसून येत नाही. या वृक्षारोपणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. महापालिकेचे अनेक कर्मचारी या कामात सहभागी झाले होते. मात्र, काही दिवस ही मोहीम राबविण्यात आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शहरातील फुटाळा तलाव परिसरासह शहरातील विविध चौक, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले होते. ज्या ठिकाणी काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. त्या ठिकाणी त्याचे अवशेष सुद्धा दिसत नाही. अनेक ठिकाणी वृक्षाला लोखंडी कठडे लावण्यात आले होते. मात्र, ते गायब झाले आहे. लोकसहभागातून ही मोहीम राबविण्यात आल्यानंतर संबंधीत सामाजिक संस्थांनी त्यावेळी वृक्ष जगविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यावेळी केवळ छायाचित्र काढण्यासाठी मोहीम राबविली गेली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२०१० व २०११ या वर्षांत नागपूर शहरात रस्त्यांशेजारी आणि विविध सार्वजनिक भागात ५० हजारांपेक्षा अधिक झाडे लावली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१२मध्ये लोकसहभागातून वृक्षारोपण करीत १ लाखाच्या जवळपास झाडे लावण्यात आली. मात्र, त्यातील ६० टक्क्यांहून अधिक झाडे आज नामशेष झाली आहे. शहरात लावलेल्या झाडांची एकंदर संख्या, लोखंडी/ लाकडी कुंपणासह लावलेली झाडे, सुकलेल्या व तुटलेल्या झाडांची संख्या आणि लावलेल्या झाडांच्या लागवडीचा आणि देखभालीचा खर्चाबाबत महापालिकेत नोंद नाही. शहरातील मोठय़ा रस्त्यांवर दुतर्फा २ ते अडीच हजाराच्यावर झाडे लावण्यात आली.
यामध्ये टॅबोबिया, बकुळ, चाफा, अशोक, पिंपळ, वड, खय्या, कडुनिंब, स्टरफुलिया आदी झाडांचा समावेश होता. ही झाडे लावण्याचा कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. मात्र, कुठल्याही झाडाभोवती ‘ट्री गार्ड’ लावण्यात आले नसल्यामुळे ती दिसत नाही. रस्त्याशेजारी, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी लावलेले झाडे कठडय़ाशिवाय कशी सुस्थितीत राहू शकतील, याचा विचार महापालिकेने केलेला दिसत नाही. प्रदूषणमुक्त नागपूर व्हावे या उद्देशाने दरवर्षी शहरात मोठय़ा प्रमाणात महापालिका लोकसहभागातून वृक्षारोपण मोहीम राबविते. मात्र, त्या मोहिमेचा पाठपुरावा केला जात नाही. ज्या ठिकाणी वृक्षारोपण केले जाते ती जागा त्यासाठी उपयुक्त आहे किंवा नाही याचा विचार केला जात नसल्याचे दिसून येत आहे.
‘झाडे लावा, पण मेली ती मेली, जगली तेवढी आपली’ अशा धोरणानुसार महापालिकेतर्फे वृक्षारोपण मोहीम राबविली जात असली तरी महापालिकेसोबत जनतेने आणि सामाजिक संस्थेने त्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, हे तितकेच खरे.