बहुजन समाज पक्षाने नागपूर शहरात संघटनात्मकदृष्टय़ा अधिक सक्षम होण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने प्रथमच शहरासाठी स्वतंत्रपणे अध्यक्ष नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. याआधी संपूर्ण जिल्ह्य़ासाठी एकच अध्यक्ष होता. आता जिल्ह्य़ाची शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करण्यात आली असून, या पदावर दोन वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.
बसपला विधानसभा निवडणुकीत विदर्भात ७.९ टक्के मते मिळाली. नागपुरात अपेक्षापेक्षा पक्षाला अधिक मतदान झाले. उत्तर नागपुरात पक्षाचा उमेदवार अगदी काही हजार मतांनी मागे पडला. या पाश्र्वभूमीवर पक्षाने नागपूर शहरावर अधिक लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनात्मक फेरबदलात पक्षाने नागपूर जिल्हाध्यक्ष असलेल्या विश्वास राऊत यांना जिल्ह्य़ाच्या जबाबदारीतून मुक्त केले. ते २०१२ पासून जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे केवळ नागपूर शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. राऊत यांना शहराध्यक्ष करण्यात आले आहे. आधी राऊत यांच्याकडे जिल्ह्य़ातील १२ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. आता त्यांना नागपुरातील सहा मतदार संघावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. तर नागपूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी वृक्षराज बन्सोड यांची निवड करण्यात आली.
बसपाच्या संघटन बांधणीकरिता अलीकडे सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सुरेश माने व प्रदेशाध्यक्ष विलास गरुड उपस्थित होते. या बैठकीत शहर उपाध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र पडोळे आणि शहर सरचिटणीसपदी भाऊसाहेब गोंडाणे यांची निवड करण्यात आली. बसपा प्रमुख मायावती यांनी विधानसभा निवडणुकानंतर राज्यातील सर्व समित्या बरखास्त केल्या होत्या. आता संघटनेची नव्याने पुनर्बाधणी करण्यासाठी अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्याअंर्तगत विश्वास राऊत यांनी शहराची जबाबदारी देण्यात आली आहे.