एखाद्या माणसाचे आयुष्य, त्यातले चढउतार, त्याचा संघर्ष, मिळवलेले यश या सगळ्यात असलेले नाटय़, भावना यांचे दर्शन चरित्रपटांतून घडविण्याचा प्रयत्न नेहमीच चित्रपटांतून केला गेला आहे. परंतु त्यातही निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती जिवंत असताना त्यांच्यावरती चित्रपट करण्याचे आव्हान वेगळे असते. दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी मिल्खा सिंगच्या जीवनातील वास्तव चित्रपटरूपात अधिक प्रखरपणे चितारून हे आव्हान पेलले आहे. ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी केलेला विक्रम सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु जगविख्यात धावपटू बनण्याच्या ध्येयापर्यंत त्यांना नेणारी प्रेरणा, त्यामागचे कष्ट, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या नाटय़पूर्ण घटना लोकांपुढे आलेल्या नाहीत. दिग्दर्शकराकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट मिल्खा सिंग यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय भावनाशील पद्धतीने मांडतो. दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चित्रपट निश्चितपणे प्रेरणादायी ठरतो.
लहानपणीचा मिल्खा सिंग (जपतेज सिंग) आपली मोठी बहीण इसरी (दिव्या दत्ता), आई-वडील यांच्यासोबत राहात असताना फाळणीमुळे कुटुंबाची वाताहत होते. छोटय़ा मिल्खा सिंगला परागंदा व्हावे लागते. निर्वासितांच्या छावणीत खूप दिवसांनी त्याला त्याची मोठी बहीण इसरी पुन्हा भेटते. बहिणीच्या नवऱ्याकडून वाईट वागणूक मिळाल्यानंतर छोटा मिल्खा स्वत:ची वाट चोखाळायचा प्रयत्न करतो. चोऱ्या करतो, मारामारी करतो. कोळसा चोरून उपजीविका करण्याचा प्रयत्न करत असतानाच मिल्खा सिंग (फरहान अख्तर) मोठा होतो. त्याची भेट बिरोशी (सोनम कपूर) होते आणि तिथून त्याला आयुष्यात चांगले काही करण्याची प्रेरणा मिळते. मग तो लष्करात जातो आणि पुढे जगप्रसिद्ध धावपटू बनतो.
लेखकाने अतिशय भावनाशील पद्धतीने चित्रपटाची पटकथा गुंफली आहे. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यातील भावविवश करणारे प्रसंग, त्यातूनच त्यांना मिळालेली प्रेरणा, त्यांना फाळणीमुळे झालेला त्रास, त्यांच्या आई-वडिलांचा विशेषत: वडिलांचा मृत्यू समोर पाहावा लागल्याची घटना, त्याचा त्यांच्या मनावर खोलवर झालेला परिणाम या सगळ्या गोष्टी अतिशय थेटपणे परंतु तरलतेने मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. फाळणीनंतर उफाळलेला हिंसाचार, वडिलांच्या मृत्यूनंतर सुरू झालेला मिल्खा सिंग यांचा खडतर प्रवास, जगविख्यात धावपटू बनण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट याचे प्रभावी चित्रण दिग्दर्शकाने केले आहे. लेखक-दिग्दर्शकाच्या यशामध्ये छायालेखन आणि संगीताचाही मोठा सहभाग आहे. चित्रपटाची सुरुवात १९६० मधील रोम ऑलिम्पिक्समध्ये मिल्खा सिंग यांनी धावण्याच्या शर्यतीत घेतलेला सहभाग, त्यात आलेले अपयश इथपासून होते. मध्यांतरानंतर ४०० मीटर शर्यत विक्रमी वेळेत धावून पूर्ण करण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा घेऊन मिल्खा सिंग अपार कष्ट करतात आणि यशस्वी ठरतात हा सगळा घटनाक्रम सविस्तर पण तितक्याच परिणामकारकतेने येतो.
चित्रपटाची लांबी हा प्रेक्षकाला काहीसा त्रासदायक ठरणारा मुद्दा आहे. परंतु सर्व प्रमुख कलावंतांचा अभिनय, अतिशय भावपूर्ण प्रसंगांच्या गुंफणीतून लेखकाने मांडलेला मिल्खा सिंग यांचा जीवनपट लांबी अधिक असली म्हणून खूप खटकत नाही. किंबहुना हिंदी चित्रपटांचे ढोबळ आणि खोटे विषय आणि तितकीच सरधोपट, गल्लापेटीकडे लक्ष ठेवून केलेली मांडणी याउपर जात दिग्दर्शक-लेखक-छायालेखक यांनी साकारलेला रूपेरी पडद्यावरचा मिल्खा सिंग खूप भावतो. काल्पनिक कथानकांच्या पलीकडे जिवंत व्यक्तींचा जीवनपट अधिक नाटय़पूर्ण ठरू शकतो हे हा चित्रपट अधोरेखित करतो.
फरहान अख्तरने समरसून साकारलेली मिल्खा सिंग यांची व्यक्तिरेखा हे या चित्रपटाचे आणखी एक बलस्थान ठरते. ‘फ्लॅशबॅक’ आणि वर्तमानकाळ यातील भेद दाखविण्यासाठी छायालेखनाचे कौशल्य दाखवून चित्रपट वेगळी उंची गाठतो. मिल्खा सिंग यांनी ५० च्या दशकात केलेला विक्रम, त्यातला थरार, त्यांचा विजय आजच्या प्रेक्षकासमोर तितक्याच प्रभावी पद्धतीने रूपेरी पडद्यावर उलगडून दाखवताना प्रेक्षक थरारून न गेला तरच नवल. दिव्या दत्ताने साकारलेली मिल्खा सिंगच्या मोठय़ा बहिणीची व्यक्तिरेखा, पवन मल्होत्राने साकारलेला गुरुजी आणि प्रशिक्षकाची चोख भूमिका बजावून योगराज सिंग यांनी केलेला अभिनय हीसुद्धा चित्रपटाचे बलस्थाने ठरतात.

रॉम्प प्रॉडक्शन्स
भाग मिल्खा भाग
निर्माते – वायकॉम १८, राकेश ओमप्रकाश मेहरा
दिग्दर्शक – राकेश ओमप्रकाश मेहरा
लेखक – प्रसून जोशी
संगीत – शंकर एहसान लॉय
कलावंत – फरहान अख्तर, दिव्या दत्ता, आर्ट मलिक, पवन मल्होत्रा, योगराज सिंग, प्रकाश राज, मीशा शफी, सोनम कपूर, दलीप ताहील व अन्य.