सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला जात असताना दुसरीकडे पाटबंधारे विभागाने हाती घेतलेल्या गोदावरी नदीवर विकसित करावयाच्या घाटाच्या कामात आता धमकीचे बांध आडवे येत आहे. नदीवर लक्ष्मी नारायण पूल ते उध्र्व बाजूकडील ज्या ठिकाणी ४०० मीटरचा घाट विकसित केला जाणार आहे, त्या जागेवर एकाने दावा सांगत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावले. परिणामी, हे काम सुरू करण्यासाठी अभियंते व कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाने पोलीस यंत्रणेकडे केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा वर्षभरावर येऊन ठेपल्याने त्याच्याशी निगडित कामे शक्य तितक्या लवकर सुरू करून पूर्णत्वास नेण्याकडे जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पर्वणी काळात गोदापात्रात स्नानासाठी जमणाऱ्या लाखो भाविकांची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने कन्नमवार पुलाच्या खालील बाजूस तसेच दसकपंचक या ठिकाणी गोदावरीच्या दोन्ही तीरांवर एकूण तीन हजार मीटर अंतराचे घाट नव्याने बांधण्यात येणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेले घाट पुरेसे ठरणार नसल्याने भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नवीन घाट अनिवार्य असल्याचे सूचित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नाशिक व नगर पाटबंधारे विभागाकडून कन्नमवार पुलाच्या खालील बाजूस ते लक्ष्मीनारायण मंदिर या परिसरात तसेच दसकपंचक, नासर्डी व गोदावरी नदीच्या संगमावरील खालील भागांत वेगवेगळ्या आकाराचे घाट साकारले जाणार आहेत. या कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.
दरम्यानच्या काळात पाटबंधारे विभागाने घाट विकसित करण्याच्या कामासंबंधी सर्वेक्षण व इतर आनुषंगिक कामे हाती घेतली. ही सर्व कामे शासनाच्या मालकीच्या जागेत होणार असल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. ही कामे सुरू असताना एका व्यक्तीने लक्ष्मीनारायण पूल ते उध्र्व बाजूची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कामे सुरू केली जाऊ नयेत आणि सुरू केल्यास त्याचे अनिष्ठ परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी संबंधिताने या विभागाच्या कार्यालयात येऊन दिली. त्यास या विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील बाफना यांनी दुजोरा दिला. या धमकीमुळे घाट बांधण्याचे काम सुरू करता आलेले नाही. हे काम सुरू करण्यासाठी अभियंते व कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाने पोलीस यंत्रणेकडे केली असल्याचे बाफना यांनी सांगितले.
उपरोक्त जागेचे सात-बारा उतारे काही दिवसांत प्राप्त होणार आहेत. महसूल यंत्रणेच्या नोंदीनुसार ही जागा शासनाच्या मालकीची आहे. अनेक वर्षांपासून ती पडीक असल्याने संबंधिताकडून तसा दावा केला जात आहे. तथापि, कागदपत्रे सादर केल्यानंतर हा विषय मार्गी लागू शकेल, असे बाफना यांनी नमूद केले. सिंहस्थातील कामांचा आढावा सोमवारी जिल्हास्तरीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोणते काम कोणत्या टप्प्यावर पोहोचले आहे, कोणत्या कामात काय अडचणी भेडसावत आहे, याची चर्चा या वेळी झाले. परंतु, कुंभमेळ्यानिमित्त साकारल्या जाणाऱ्या नवीन गोदा घाटाचे काम पहिल्याच टप्प्यात अडचणीत सापडल्याचे या घटनेने अधोरेखित झाले आहे.’