ओमेगा-३ हे मेदाम्ल माणसाच्या आरोग्याशी संबंधित असले तरी वैद्यकीय क्षेत्रातही या विषयी मोठी अनास्था आहे. धावपळीच्या आणि विशिष्ट जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल हे परवलीचे शब्द झाले आहेत. देशात फार मोठय़ा संख्येने मधुमेही आहेत. जगभरात मधुमेहींचा देश म्हणूनही भारताकडे पाहिले जात आहे. मधुमेहींना, हृदय विकाराचा झटका आलेल्यांना किंवा गर्भवतीला वेगवेगळ्या चाचण्या करायला लावून रोगाविषयी निश्चित निदान करण्याकडे डॉक्टरांचा कल असतो. मात्र, ओमेगा-३ची कमतरता असल्यास त्याचा परिणाम हृदय, मूत्रपिंड, मेंदू, हाडांचे आरोग्य, त्वचा, यकृत आणि इतरही अवयवांवर होत असताना ओमेगा-३ची चाचणी करा, असे डॉक्टरही सांगत नाही. अशी चाचणी करण्याची सोयही आपल्याकडे नाही.
जवसामध्ये ओमेगा-३चे प्रमाण सर्वाधिक असले तरी गर्भवतींनी खरे तर जवस खाऊ नये. कारण त्यातील ‘एसडीजी’ हा घटक गर्भपाताला कारणीभूत ठरू शकतो. गरिबांना जवस चटणीच्या रूपाने माहीत असले तरी श्रीमंतांमध्ये अजूनही जवस किंवा त्यातील ओमेगा-३ विषयी अज्ञान आहे. एवढेच नव्हे तर डॉक्टरांनाही याविषयी माहिती नाही किंवा त्यांना माहिती करून घ्यायचे नाही, असे या क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधकांचे म्हणणे आहे. कारण तसे केल्यास डॉक्टरांचे आर्थिक गणित विस्कटण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय माहिती असलेल्या ज्ञानावरच वर्षांनुवर्षे निदान करीत राहणेच, बहुतेक डॉक्टरांना योग्य वाटते. बरेच डॉक्टर नवनवीन वैद्यकीय संशोधनासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांना जात नाहीत. नवीन औषधांबाबत अद्ययावत राहणे हा बहुतेक डॉक्टरांचा पिंड नसल्याचे खेदानेच म्हणावे लागेल. कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित तेलबिया संशोधन प्रकल्पातून जवसाचे आरोग्यदायी महत्त्व वाढण्यास बरीच मदत झाली.
जवसात ओमेगा-३ हे शरीराला अत्यावश्यक मेदाम्ल (फॅटी अ‍ॅसिड) भरपूर प्रमाणात आहे. जैविक प्रक्रियांमध्ये ते महत्त्वपूर्ण योगदान देते.
या विषयी ज्येष्ठ शास्त्रज्ञ जवस (तेलबिया) डॉ. प्रकाश घोरपडे म्हणाले, ओमेगा-३ विषयी डॉक्टरांनाच माहिती नाही तर सामान्य माणसांची तऱ्हाच वेगळी. याविषयी माझे काही डॉक्टर मित्रांशी बोलणे झाले आहे. त्यांनीही याविषयीचे अज्ञान दर्शवले आहे. नागपुरातील एक-दोन वरिष्ठ डॉक्टरांनी ओमेगा-३ची औषधे देणे सुरू केले असून रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवले आहे, हे त्यातल्या त्यात चांगले आहे. हृदयाविषयी आजार असल्यास डॉक्टर सी रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटिन, होमासायस्टेन, एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल, एचडीएल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लायसेरीडस् आणि टीसी व एचडीएल इत्यादी सात आजारांचे काम ओमेगा-३ फत्ते करू शकते. पण, प्रत्येक चाचणीमागे डॉक्टर वेगवेगळी औषधे लिहून देतात. मात्र, त्यावर ओमेगा-३ हा एकच उपाय आहे. (क्रमश:)