धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीविरोधात टोकाची भूमिका घेणारे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांचा विरोध आता मावळला असून बुधवारपासून आपण प्रचारात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. गोपीनाथ मुंडे यांनी केलेली मध्यस्थी आणि व्यापक जनहित लक्षात घेता आपण महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गोटे यांनी दिली.

माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या निवासस्थानी महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे तसेच जनराज्य आघाडीचे अध्यक्ष आमदार डॉ. अपूर्व हिरे व कार्याध्यक्ष अद्वय हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोटे यांची पत्रकार परिषद झाली. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या गोटे यांनी अलीकडेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर तोंडसुख घेत त्यांना लक्ष्य केले होते. तसेच राज्यात आठ टक्क्यापेक्षा अधिक संख्येने असलेल्या धनगर समाजातील एकाही व्यक्तीला चार प्रमुख पक्षांनी उमेदवारी न दिल्याने समाजाला हा राजकीय अस्पृष्य मानण्याचा प्रकार असल्याची टीका केली होती.
लोकसभा निवडणूक लढविण्याचा कोणताही विचार नसतांना काही दिवसांपूर्वी मुंंडे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा आपल्याकडे आग्रह धरला होता. त्यास होकार दर्शवून कामालादेखील लागलो. पण ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात आल्याने त्या नाराजीतून आपण महायुतीविरोधात भूमिका घेतली होती. मात्र वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी नाकारण्याची जी कारणे दिली गेली. त्यामुळे आपले समाधान झाल्याचे गोटे यांनी नमुद केले. सत्ताधाऱ्यांनी जनतेची घोर निराशा केल्याने जनराज्य आघाडीने महायुतीला पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती डॉ. अपूर्व हिरे यांनी दिली. तर, नाशिक व धुळे या दोन्ही मतदार संघात पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता असली तरी जनता कोणत्याही प्रलोभनांना भूलणार नसल्याचा आशावाद अद्वय हिरे यांनी व्यक्त केला.