नागरी कामांच्या कागदपत्रांवर प्रभारी आयुक्त स्वाक्षरी करत नसल्याची तक्रार करत सत्ताधारी मनसेच्या नगरसेवकांनी मंगळवारी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा फज्जा उडाला. या बैठकीकडे मित्रपक्ष भाजपसह विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी पाठ फिरविली. केवळ दोन-तीन नगरसेवक उपस्थित राहिले. सभागृह नेता शशिकांत जाधव यांनी त्यांच्या सोबतीने प्रभारी आयुक्तांची भेट घेऊन पुन्हा आपले गाऱ्हाणे मांडून विकास कामांच्या फाईल्सवर स्वाक्षरी करावी, अशी मागणी केली.
रखडलेल्या फाईल्सच्या मुद्यावरून सत्ताधारी मनसेने बोलाविलेल्या बैठकीला विरोधक तर दूर, पण सत्ताधाऱ्यांचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपचे कोणी पदाधिकारी फिरकले नाहीत. काँग्रेसचे माजी गटनेते लक्ष्मण जायभावे त्यास अपवाद ठरले. असे एक-दोन नगरसेवक वगळता कोणी उपस्थित न झाल्यामुळे मनसेच्या नगरसेवकांची बैठक अशी झालीच नाही. मागील पाच महिन्यांपासून या मुद्यावरुन मनसे आंदोलन करत आहे. पालिकेला पूर्णवेळ आयुक्त द्यावा, या मागणीसाठी आधी मुख्यालयास टाळे ठोकण्यात आले होते. त्यानंतर अलीकडेच मनसेच्या काही नगरसेवकांनी आंदोलन करत स्वाक्षरी होत नसल्यामुळे कामे रखडल्याचा आरोप केला. त्यावेळी प्रभारी आयुक्तांनी फाईल्स मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सिंहस्थ वगळता अन्य कामांच्या फाईल्स मंजूर केल्या नसल्याचा मनसेचा आक्षेप आहे. त्यातच प्रत्येक फाईल्स सोबत काम सुरू होण्यापूर्वी आणि काम झाले असल्यास पूर्णत्वानंतरची स्थिती याची छायाचित्रे जोडण्याची सूचना प्रभारी आयुक्तांनी केली. सर्व फाईल्सला छायाचित्रे जोडण्यासाठी आणि त्या पुन्हा सादर करण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी जाईल. यामुळे सर्व विकासकामे ठप्प होतील. या विषयावर निर्णय घेतला न गेल्यास पालिकेला टाळे ठोकण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. सर्वपक्षीय बैठकीचा फज्जा उडाल्याने सभागृह नेते जाधव यांच्यासह अन्य पक्षांच्या नगरसेवकांनी प्रभारी आयुक्तांची भेट घेतली. विरोधकांच्या मदतीने प्रभारी आयुक्तांवर दबाव आणण्याचा मनसेचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. सदस्यांनी प्रभारी आयुक्त सोनाली पोंक्षे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. रखडलेल्या फाईल्सवर त्वरित स्वाक्षरी करून विकास कामांचा मार्ग खुला करावा, अशी मागणी करण्यात आली.