रेल्वे रुळावरून इंजिन घसरून होणाऱ्या रेल्वे अपघाताची संख्या गेल्या दोन महिन्यांमध्ये सातत्याने वाढत असून कल्याण परिसरामध्येच हे प्रकार वारंवार घडत आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास कल्याण स्थानकाजवळ अमरावती-सीएसटी एक्स्प्रेसचे इंजिन आणि मागील तीन डबे रेल्वे रुळावरून घसरून झालेल्या अपघातामुळे मध्य रेल्वेची कसारा-कल्याण मार्गावर होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुमारे आठ तास ही एक्स्प्रेस रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रेल्वेचा कर्मचारी वर्ग आणि प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचून व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असताना लोकप्रतिनिधींनी मात्र या अपघाताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. कल्याण, भिवंडी, ठाणे परिसरातील एकही खासदार घटनास्थळी फिरकलेच नसल्याने ‘खासदार गेले कुणीकडे’ असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होऊ लागला आहे. रेल्वे हा आमचा प्रथम प्राधान्याचा विषय आहे. रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी आम्ही आग्रही भूमिका मांडून प्रवाशांना जास्तीतजास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करू, रेल्वे अर्थसंकल्पातून मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यासाठी प्रयत्न करू, असा प्रचार करून रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नाबद्दल कणव दाखवणाऱ्या खासदारांनी सध्या रेल्वे प्रश्नाकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रतिनिधींबद्दलचा असंतोष दाटून आला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार होऊ लागले असून सिग्नल यंत्रणा बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, पेंटोग्राफ तुटणे, रुळांना तडा जाणे असे प्रकार दररोज घडू लागले आहेत. देखभाल दुरुस्तीच्या कामांमध्ये असलेल्या त्रुटींमुळे आणि वापरल्या जाणऱ्या गुणवत्ता नसलेल्या साहित्यामुळे हे प्रकार घडत आहेत, असा सूर प्रवासी संघटनांकडून आळवला जात आहे. तर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे प्रशासनाची पुरती कोंडी होऊ लागली आहे. अशा वेळी लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन रेल्वे प्रशासनाकडून या प्रश्नांची उत्तरे मागण्याची गरज असताना खासदार आणि आमदार मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कल्याण हा परिसर माझ्या मतदारसंघात येत नसल्यामुळे त्याविषयी मी भाष्य करू शकत नाही. मात्र ठाण्यातील प्रत्येक रेल्वेस्थानकात चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. तर खासदार कपिल पाटील यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन संपर्क करतो, अशी प्रतिक्रिया दिली.    
बोलघेवडे लोकप्रतिनिधी
रेल्वे प्रश्नांवर मोठय़ा आवेशाने बोलणाऱ्या खासदारांना रेल्वे प्रश्नाची जाण नसल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. शिवाय अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा जाब विचारला जात नसल्याने रेल्वे प्रशासनसुद्धा सुस्तपणे कारभार करू लागले आहे. भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तिन्ही ठिकाणचे खासदार रेल्वे प्रश्नावर बोलघेवडेपणा करत असून त्यांच्या कृतीतून मात्र काहीच दिसत नाही. त्यामुळे बोलायचे एक आणि करायचे दुसरेच असा पवित्रा या खासदारांनी घेतला आहे. लोकप्रतिनिधींच्या अशा वागण्याचा प्रवाशांना तिटकारा आला असून खासदारांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे मधू कोटियन यांनी दिली.
अपेक्षाभंग होतोय
रेल्वे वरचेवर बंद पडत असल्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या दररोज होणाऱ्या मनस्तापाची कोणतीच जाणीव लोकप्रतिनिधींना नसल्याने हा प्रकार घडत आहे. यापूर्वीचे खासदारही या प्रश्नाला बगल देत असताना नव्या खासदारांकडून चांगले काही घडेल अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षा फोल ठरू लागल्या आहेत. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांनीच आवाज उठवण्याची गरज असल्याचे प्रवासी एकता संघाचे नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.