गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेली बहुतांश शस्त्रास्त्रे उत्तर प्रदेश वा बिहारमधील अवैध कारखान्यांत तयार केलेले असतात. मात्र, या शस्त्रांसोबत आढळणारी जिवंत काडतुसे प्रामुख्याने कुठल्या तरी सरकारी दारूगोळा कारखान्यातील असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे जिवंत काडतुसांची तस्करी याच कारखान्यातून होत असावी, असा शक्यता आहे. राज्यातील एका दारूगोळा काराखान्याबाबत पोलिसांनीच संशय व्यक्त केला आहे.  बबलू सिंह नावाचा फरार आरोपी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला हवा आहे. तो हाती लागला तर सरकारी दारूगोळा कारखान्यातील काडतुसांच्या तस्करीवर प्रकाशझोत पडेल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.

रामदेव बाबांवर अ‍ॅट्रॉसिटी
मुंबई : दलितांबाबत अवमानकार वक्तव्य करणारे योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात दलित अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला अत्याचार प्रतिबंधात्मक समितीच्या वतीने मंगळवारी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. लखनऊ येथील एका जाहीर सभेत रामदेव बाबांनी दलित समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात रामदेव बाबा यांच्यावर यापूर्वीच लखनऊ आणि जोधपूर येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रेल्वे आगींप्रकरणी एकाला अटक
मुंबई : रेल्वे गाडय़ांतील शौचालयांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करणारा अब्दुल वाहिद शेख (२८) याला मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर अटक करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरातील छायाचित्रणाच्या मदतीमुळे अब्दुलला पकडणे शक्य झाले. गेल्या बुधवारी डेक्कन क्वीन, सह्य़ाद्री एक्स्प्रेस आणि हावडा मेलमधील शौचालयात त्याने आग लावण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या रविवारी सेवाग्राम एक्स्प्रेसच्या चार डब्यांतील शौचालयांमध्ये त्याने आग लावली होती.

छत कोसळून एक जखमी
मुंबई : कांदिवलीच्या आंबेडकर रुग्णालयातील छताचा भाग मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कोसळला. यामुळे एक्स रे विभागात काम करणारी संचिता उतेकर ही महिला कर्मचारी जखमी झाली असून तिच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले.  रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेंद्र वाडीवाला यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पत्नीच्या मृत्युप्रकरणी पतीला सक्तमजुरी
ठाणे : क्षुल्लक कारणावरून पत्नीला मारहाण करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बंधू वाघे (३२) या तरुणाला ठाणे अतिरिक्त  सत्र न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. भिवंडी येथील वाघीवळी गावामध्ये संजू आणि तिचा पती बंधू वाघे एका वीटभट्टीवर ते काम करीत होते. ७ मार्च २०१२च्या रात्री बंधू याने आणलेले मासे शिजवून देण्यास संजूने नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या बंधूने तिला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. भिवंडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. व्ही. वीरकर यांनी बंधू याला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.