नवी मुंबई महानगरपालिका एकीकडे शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी भटकंती करत असताना केवळ ठरावीक शाळांचा कायापालट केल्याने खऱ्या लाभार्थीना मात्र यांचा लाभ घेता न आल्याचा प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या शाळा क्रमांक ७९ मध्ये विद्यार्थ्यांना साधे सुलभ शौचालय नसून शाळेमध्ये अनेक असुविधांची मोठय़ा प्रमाणावर वानवा आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे ‘स्कूल व्हिजन’ नक्की आहे तरी कुणासाठी, असा सवाल या शाळेतील शिक्षक आणि पालकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षण विभागाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पोटतिडकीने प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेचे असणारे स्कूल व्हिजन या शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आले. मात्र खरोखरच गरजेच्या असणाऱ्या परिसरात हे व्हिजन पोहोचलेलेच नाही. नवी मुंबई दिघा येथील सुभाष नगर येथे महापालिकेची हिंदी माध्यमांची शाळा क्रमांक ७९ ही पाच वर्षांपासून सुरू आहे. यादवनगर, सुभाष नगर, गवते वाडी, विष्णुनगर, इलठण पाडा येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय हिंदी भाषकांची मुले या शाळेत शिकतात. इयत्ता १ ली ते ४ थीचे वर्ग या शाळेत सुरू असून २८५ विद्यार्थी सकाळ आणि दुपारच्या सत्रात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. लहान मुलांसाठी असणारे शौचालय हे उघडय़ावर बसण्यापेक्षाही अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहेत. या शौचालयाला लागून असलेल्या पाण्याच्या नळातील पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागत आहे. त्यातच बसण्यासाठी बॅचेसची दुरवस्था, शाळेचे गळते छत, नादुरुस्त लाइट, शालेय साहित्य ठेवण्यासाठी कपाटाचा अभाव, त्यातच उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली सुरू असणारी शाळा अशा अवाढव्य समस्यांना सध्या विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिकेने या शाळेला पर्यायी जागादेखील मंजूर केली आहे. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पालक वर्ग आणि शिक्षक वर्ग यांनी वारंवार सुविधांसाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मतदारसंघातील शाळेकडेच आमदारांचे दुर्लक्ष
दिघा-रबाले परिसरातील शाळांच्या कार्यक्रमांना आमदार संदीप नाईक हजेरी लावून पालिकेच्या स्कूल व्हिजनचे कौतुक करतात. वेळप्रसंगी आमदार निधी देण्याचेदेखील सूचित करतात. मात्र त्यांच्याच मतदारसंघातील झोपडपट्टी परिसरातील ही शाळा त्यांना कशी दिसली नसेल, असा प्रष्टद्धr(२२४)्ना स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केला आहे; तर याबाबत स्थानिक नगरसेवक बहादूर बिस्ट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

नवी मुंबई महानगरपालिकेकडे एमआयडीसीकडील अतिरिक्त वाढीव वर्गासाठीची नियोजित जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार या शाळेची बांधणी करण्यात येईल. तर प्राथमिक स्वरूपात सध्या भरत असलेल्या शाळेत सुविधा दिल्या जातील.
-अमरीश पटनिगिरे,
उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७९ ची स्थिती ही संतापजनक आहे. हिंदी भाषिकांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र विभाग सुरू करण्याची मागणी करणार आहे. तर या शाळेला मी लवकरच भेट देऊन त्यांचा आढावा प्रशासनाला सादर करणार आहे.
-वीरेश सिंग, उपसभापती, शिक्षण मंडळ