अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या टोल वसुलीमुळे कंटाळलेल्या खासगी छोटय़ा वाहनधारकांसाठी जून महिन्याचा पहिला दिवस टोलमुक्तीचे समाधान देऊन गेला. नागपूरच्या सीमेवरील पाच टोलनाक्यांवर रविवारी मध्य रात्रीनंतर सरकारी आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. सोमवारी सकाळी नाक्यांवरून जाणाऱ्यांना छोटय़ा चार चाकी वाहनधारकांसाठी हा सुखद धक्का होता. ऐरवी नाका आल्यावर पैसे काढून तयार असणाऱ्या एस.टी. वाहकालाही आज आराम मिळाला. दरम्यान, उमरेड आणि हिंगणा मार्गावरील नाक्यावर सरकारी आदेश डावलून काही वेळ टोलवसुली सुरू होती तर सरकारी निर्णयाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप, सेना, मनसे या संघटनेत चढाओढ लागली होती. दुसरीकडे टोलमुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर कंत्राटदारांना त्यांचे पैसे वेळेत मिळतील याची सरकारने तजवीज करावी, अशी प्रतिक्रिया टोलकंत्राटदारांकडून व्यक्त करण्यात आली.
प्रतिनिधी, नागपूर
दररोज टोल द्यावा लागणाऱ्या वाहनचालकांची आज मात्र त्याच टोलनाक्यावरून सुटका झाल्याने कार-जीप चालकांना आश्चर्याचा धक्काच बसला. शहरालगतच्या पाचही टोलनाक्यावर आज हे चित्र दिसून येत होते. शासनाच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत करून ‘टोल’मधून सुटका झाल्याने समाधान व्यक्त केले.
चारचाकी वाहनचालकांना सगळीकडेच मोठय़ा प्रमाणात ‘टोल’ द्यावा लागत होता. त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. काही राजकीय पक्षांनी आंदोलनही केले. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप व शिवसेनेने ‘टोल’ हटवण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल हटवला जाण्याची घोषणा केली. या घोषणेची अंमलबजावणी रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली. या टोलमुक्तीचा फायदा चारचाकी कार व जीप हे वाहने व महामंडळाच्या बसेसला होत आहे. त्यामुळे चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजचा पहिला दिवस सुखद धक्का देणारा ठरला.  
नागपूर शहरालगत हिंगणा मार्ग, वाडी, काटोल नाका, उमरेड नाका आणि अमरावती मार्गावरील गोंडखैरी येथे खासगी कंपन्यांचे व महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे टोल नाके आहेत. शहरातून बाहेर पडणाऱ्या आणि शहरात येणाऱ्या वाहनचालकांना टोलच्या नावावर आपले खिसे खाली करावे लागत होते. आज मात्र चारचाकी वाहनचालक व महामंडळाच्या बसचालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते. अनेक कार चालकांना टोल बंद झाल्याची कल्पनाच नव्हती. कारचे चालक नेहमीप्रमाणेच टोल नाक्यावर येऊन थांबत होते. तेथील कर्मचारी टोल बंद झाल्याचे सांगताच स्मित हास्य करून ते पुढे जात होते. महामंडळाच्या बसचालकांना मात्र टोल बंद झाल्याची कल्पना असल्याने ते नाक्यावर न थांबताच पुढे जात होते.
चारचाकी वाहने व एसटी बसेसला टोलमधून सवलत दिली असली तरी ट्रकला मात्र दूर अंतरावरूनच थांबण्याचा इशारा कर्मचारी देत होते. यावेळी काही ट्रक चालक नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. कारण त्यांना अन्य वाहने टोल न भरता नाक्यावरून जात असल्याचे दिसून येत होते. परंतु चालकाची समजूत घातल्यानंतर ते टोल भरण्यास तयार होत. टोल भरण्यासाठी नाक्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागायच्या. आज मात्र हे चित्र नव्हते. त्यामुळेही चालकांना हायसे वाटत होते. आज मात्र माल असलेले ट्रक रांगेत उभे असलेले दिसून येत होते. एका बाजूने टोल न भरण्याची सवलत दिल्याने किती नुकसान होते की काय हे बघण्यासाठी टोल भरणारी वाहने आणि न भरणारी वाहने यांची नोंद कर्मचाऱ्यांकडून केली जात होती.
या टोलमुक्तीचा लाभ शहरातील दोन लाख चारचाकी वाहनचालकांना मिळणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागात असलेल्या नोंदीनुसार शहरात दोन लाख चारचाकी वाहने आहे. तर, महाराष्ट्र राज्य महामंडळाचा कोटय़वधी महसूल वाचणार आहे. टोल भरण्यासाठी जो वेळ वाया जात होता, तो वाहनांच्या रांगा नसल्याने वाहनचालकांमध्ये समाधान दिसून येत होते. चारचाकी वाहनांना टोलमधून मुक्ती केल्याने ट्रक मालक संघटनांही टोलमुक्ती करण्याची मागणी करू शकतात, अशी शक्यता यानिमित्ताने वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, काही नाक्यावर ‘टोल’ वसुली सुरू असल्याचे चित्र दिसत होते. काटोल नाक्यावर कारचालक थांबत असताना त्यांना तेथील कर्मचारी हातानेच जाण्याचा इशारा करत होते.
या ऊलट हिंगणा व उमरेड नाक्यावर विरुद्ध चित्र दिसून येत होते. या नाक्यावर कारचालक थांबले तर त्यांच्याकडून मात्र ‘टोल’ वसूल केला जात होता. टोल बंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कारचालक परत येऊन तेथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. वाईट अनुभव आलेले कारचालक दुसऱ्या कारचालकांना सावध करत असल्याचे चित्रही दिसून येत होते.