पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने  काँग्रेसमधील गटबाजी उघडपणे दिसून आली. काँग्रेसे नरेश पुगलिया व विजय वडेट्टीवार या दोन गटाने वेगवेगळय़ा कार्यक्रमांचे आयोजन करून मनोमिलन शक्य नसल्याचा संदेश दिला.
मोदी सरकारने २६ मे रोजी पहिला वर्धापन दिन साजरा केला. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्याचे निर्देश प्रदेश काँग्रेसने दिले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जनकल्याणचे नवे पर्वच्या माध्यमातून शेवटच्या लोकापर्यंत मोदी सरकारने वष्रेभरात केलेल्या कामाची माहिती देण्याचे आदेश दिले होते. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाचे पालन करीत शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने जटपुरा गेट येथे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी चंद्रपूर बंद व धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारचा निषेध नोंदविला. प्रत्यक्षात पुगलिया व वडेट्टीवार या दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम घेतले असते तर त्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले असते. त्याचा परिणामही व्यापक स्वरूपात दिसून आला असता. मात्र दोन वेगळे कार्यक्रम झाल्याने काँग्रेस पक्षातील गटबाजी अतिशय उघडपणे दिसून आली.
काँग्रेस पक्ष दोन गटात दुभंगल्यामुळेच गेल्या वीस वर्षांंपासून जिल्हय़ात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागत आहे. मात्र या पराभवातूनही काँग्रेस नेते बोध घेण्यास तयार नाहीत. पुगलिया व वडेट्टीवार या दोन मोठय़ा गटातून माजी आमदार सुभाष धोटे, डॉ.अविनाश वारजूकर, डॉ. विजय देवतळे, नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, रामू तिवारी, संतोष लहामगे अशा छोटय़ा छोटय़ा गटात पक्ष विभागत चालला असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे. जिल्हा पातळीसोबतच तालुका व गाव पातळीवर सुद्धा काँग्रेसचे असेच दोन ते तीन गटाचे धरणे व पुण्यतिथी कार्यक्रम बघायला मिळाले.
मिडिया भाजपविरोधी –
आ. नाना शामकुळे
प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया भाजपच्या विरोधात कायम बातम्या दाखवित असल्याची तीव्र नाराजी अमावस्या-पोर्णिमेला दर्शन देणारे भाजपचे नागपूर निवासी आमदार नाना शामकुळे यांनी व्यक्त केली. माध्यमांना भाजपविरोधात लिखाण करण्याची सवयच झालेली आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनीच मोदी सरकारची कामे मतदारांपर्यंत पोहोचवावी, असेही शामकुळे म्हणाले.