महापालिकेसह जिल्हा प्रशासन पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत गुंतले असताना पर्यावरण संतुलन संस्थेच्या वतीने गंगापूर धरणातून ‘सी प्लेन सेवा’ तसेच बोट क्लबला विरोध करण्यात आला आहे. पंतप्रधानांसह संबंधितांना यासंदर्भात नागरिकांच्या स्वाक्षरींचे निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती पर्यावरण संतुलन संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
गंगापूर धरणातून नाशिक शहरातील २० लाख नागरिकांना तसेच ग्रामीण भागाला पिण्याचे पाणी पुरविले जाते. या धरणात दुर्मीळ पक्षी मोठय़ा प्रमाणात ये-जा करत असतात. धरण परिसरात जैविक विविधता आहे. अशा परिस्थितीत गंगापूर धरणात सी प्लेन सेवेची चाचणी झाली. गंगापूर धरण परिसरात बोट क्लब देखील सुरू होणार आहे. यामुळे धरणातील पाणी प्रदूषित होणार असून पर्यावरणाच्या दृष्टीने ही गोष्ट घातक आहे. गंगापूर धरणातून सी प्लेन सेवा व बोट क्लब सुरू करू नये म्हणून पर्यावरण संतुलन संस्थेच्या वतीने सी प्लेन सेवेच्या चाचणीच्या कार्यक्रमाप्रसंगी काळ्या पट्टय़ा बांधून निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर संस्थेच्या वतीने सी प्लेन सेवा योग्य की अयोग्य या विषयावर परिसंवांदही मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारक येथे झाला. परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांनी सी प्लेन सेवा तसेच बोट क्लबला विरोध दर्शविला होता.
शहर परिसरातील बहुसंख्य नागरिकांचा विरोध असतानाही सी प्लेन सेवा आणि बोट क्लबचे घोडे दामटण्याचा जो प्रकार सुरू आहे. तो शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी संस्थेच्या वतीने नागरिकांच्या स्वाक्षरींची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्र्यांसह सर्व संबधितांना पाठविण्यात आली आहे. नागरिकांनी गंगापूर धरणातून सुरू होणाऱ्या सी प्लेन सेवा व बोट क्लबला विरोध करावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रमेश कडलग, सरचिटणीस भरत जैन, उपाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केले आहे. पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याच्या तयारीत प्रशासन गुंतले आहे. सिंहस्थात होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याविषयी प्रशासकीय पातळीवर विचार सुरू असताना गंगापूर धरणातील जल सी प्लेन सेवेमुळे आणि बोट क्लबमुळे प्रदूषित होणार असेल तर त्याविरोधातही प्रशासनाने योग्य ती कर्यवाही करण्याची आवश्यकता आहे. केवळ जल प्रदूषणाचा हा विषय नसून धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा चिंतेचा विषय असल्याने प्रशासन याविषयी कोणती भूमिका घेते, याविषयी नाशिककर उत्सुक आहेत.