निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू आणि पैशांचे वाटप करण्यात येते. अशाच मोहिमेवर निघालेल्या एका वाहनाला एका पोलीस हवालदाराने पाठलाग करून पकडले. नालासोपारा येथील पाडय़ांमध्ये वाटण्यासाठी ही दारू नेली जात होती.
महेश गोसावी हे ठाणे ग्रामीणच्या मुख्यालयात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करतात. मंगळवारी रात्री ते ठाण्याहून वसई येथील घरी परतत होते. रात्री साडेआठ वाजता मुंबई अहमदाबाद महामार्गावरील नागला चौकीच्या पुढे दोन तरुण अ‍ॅक्टिवा मोटारसायकलीवर दोन ‘टायर टय़ूब’ घेऊन जाताना दिसले. गोसावी यांना ते लक्षात आल्यानंतर त्यांनी पाठलाग सुरू केला. काही वेळाच्या पाठलागानंतर गोसावी यांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडे शंभर लिटर गावठी दारू सापडली. नालासोपारा येथील पाडय़ामध्ये ही दारू वाटप करण्यासाठी जात असल्याची कबुली त्यांनी दिली. विनीत रायकर आणि योगेश मोगरा अशी त्यांची नावे आहेत. भिवंडी येथून त्यांनी ही दारू आणली होती. या दोघांना वसईच्या वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.