विविध राजकीय पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांवरील उपचारासाठी शासकीय रुग्णालयातील अधिकारी व डॉक्टरांवर ‘दबाव’ आणत असल्याची बाब लपून नसली तरी त्याला दिवसेंदिवस खतपाणी मिळत आहे. आता तर उपचार झालेच पाहिजे, असा धमकीवजा इशाराच मिळत असल्याने हे डॉक्टर चूपराहून बुक्क्याचा मार सहन करत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स असा प्रकार आपल्या पद्धतीनेच हाताळत असल्याचे स्पष्ट होत आहे.  
सामान्य व गरीब नागरिकांवरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात शासकीय रुग्णालये स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्येकाला शासकीय रुग्णालयात नि:शुल्क योग्य ते उपचार झाले पाहिजे, असे प्रत्येकालाच वाटते. परंतु सध्या त्याला काही मर्यादाही आल्या आहेत. तसेच कुणाच्यातरी ओळखीशिवाय शासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नाही, अशी भावनाही सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे गावखेडय़ापासून तर शहरातील गल्लीबोळातील कार्यकर्ताही आता ‘नेत्या’चा आधार घेऊ लागला आहे. या नेत्यांमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आजी- माजी आमदार व मंत्र्यांचा प्रामुख्याने समावेश असतो. या सर्वाचीच ‘कारकीर्द’ व ‘प्रभाव’ डॉक्टरांना माहीत असतेच. तर काही नवोदित नेत्यांचाही समावेश त्यात असतो. ही आमदार बनण्याची पहिली पायरीच असते. लोकांचे कामे करत असल्याचे भासवण्यासाठी आधी एखादी संस्था स्थापन केली जाते. यानंतर या संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. लोकांना आरोग्याच्या सोयी कशा उपलब्ध करून दिल्या, याचे भांडवल करून लोकांची दिशाभूल केली जाते. त्याचाच लाभ निवडणुकीत घ्यावा, असे स्वप्न पाहणारेही काही महाभाग आहेत.
शहरातील मेडिकल, मेयो, सुपर स्पेशालिटी, डागा या शासकीय रुग्णालयात सवलतीच्या दरात आरोग्य सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच शासनाच्या काही योजनांचा लाभही येथे दिला जातो. या रुग्णालयात योग्य आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, असे प्रत्येकालाच वाटते. असा विचार करून काही लोक लोकप्रतिनिधींकडे जातात. राजकीय नेत्यांनाही अशा संधीचे सोने करावयाचे असते. हे राजकीय नेते मग संबंधित रुग्णालयाच्या प्रमुखाला दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून आमचा अमूक-अमूक रुग्ण आहे, त्याची जरा योग्य काळजी घ्या, अशी सूचना करतात.
संबंधित रुग्णालयाचा प्रमुखही अशावेळी नकार देऊन लोकप्रतिनिधीची नाराजी ओढवून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला तेवढेच समाधान मिळते.
वास्तविकता मात्र वेगळीच असते. डॉक्टर आपल्या पद्धतीनेच उपचार करतात. लोकप्रतिनीधींचा रुग्ण अशी वेगळी ओळख ठेवून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात नाही. अन्यथा प्रत्येक वॉर्डात ‘लोकप्रतिनिधीचा रुग्ण’ असे फलक लागले असते, असे मतही मेडिकलमधील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने व्यक्त केले.
आमच्या दृष्टीने सर्व सारखेच -डॉ. निसवाडे
मेडिकलमध्ये येणारे सर्व रुग्ण आमच्या दृष्टीने सारखेच असतात. तो लहान, मोठा किंवा अमूक लोकप्रतिनिधीचा अशी प्रतवारी नसते. मेडिकलमध्ये विदर्भातून दररोज कोणत्या ना कोणत्या लोकप्रतिनिधींचा दूरध्वनी किंवा मोबाईल येत असतो. आमचा रुग्ण आहे, त्याकडे जरा लक्ष ठेवा, असे त्यांचे म्हणणे असते. असा दूरध्वनी आल्यास आमचा एक डॉक्टर त्या रुग्णाकडे जातो. त्याची नेमकी स्थिती काय आहे, तो खरोखरच गंभीर आहे काय, त्याला कोणी पाठवले याची चौकशी करतो. शेवटी आम्ही आमच्या पद्धतीनेच त्याच्यावर उपचार करतो. ‘आमदाराचा किंवा मंत्र्याचा रुग्ण’ या भावनेने आरोग्य सेवा देत नाही. या पद्धतीने सेवा द्यायची म्हटल्यास दुसऱ्या रुग्णावर अन्याय होण्याची शक्यता असते. अशा लोकप्रतिनिधींच्या रुग्णांकडे लक्ष दिले तर अन्य गरीब, सामान्य व ज्यांचे कुणी नाही, त्यांना न्याय मिळणार नाही व समाजात वेगळा संदेश जाईल. मेडिकलमधील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून उपचार होते, असे समजणे चुकीचे आहे.