भारतात कर्करोग होणारे सर्वाधिक मृत्यू तोंडाच्या कर्करोगाने म्हणजेच, तंबाखू सेवनाने झाल्याचा संशोधन अहवाल हार्वड मेडिकल स्कूलने ‘लॅन्सेट’ या जगविख्यात वैद्यकीय नियतकालीकात प्रकाशित केला आहे. असे असतानाही मोदी सरकारने नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष व भाजपचे खासदार दिलीप गांधी व खासदार श्यामाचरण गुप्ता हे तंबाखूमुळे कर्करोग होत नसल्याचा उलट त्यामुळे अन्नपचनास मदत होत असल्याचा प्रचार करत आहे. त्यामुळे देशभरातील तंबाखू उद्योगपतींच्या हितासाठीच मोदी सरकार देशातील कोटय़वधी जनतेस मृत्यूच्या दाढेत सोडण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.
तंबाखूविरोधात जनजागृती करण्यासाठी, तसेच सिगारेट, बिडी व तंबाखूच्या पॉकेटवरील ८५ टक्के जागेवर धोक्याचा इशारा छापण्यासाठी १५ ऑक्टोबर २०१४ रोजी संसदीय समिती नेमण्यात आली. देशातील तंबाखू उद्योगपतींच्या दबावामुळेच १ महिन्याच्या आतच डॉ. हर्षवर्धन यांच्याकडील आरोग्यमंत्रीपदाचा पदभार काढून त्यांना विज्ञान व प्रौद्योगिकी हे खाते देण्यात आले. त्यानंतर पाचच दिवसांनी श्यामाचारण गुप्ता यांची संसदीय समितीवर नियुक्ती केली. श्यामाचरण गुप्ता हे २०० ते २२५ कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या श्याम ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत. ‘श्याम बिडी’ हे त्यांच्याच कंपनीचे उत्पादन आहे, तर समितीचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांचे संबंध गायछाप तंबाखूचे मालक मालपाणी व माणिकचंद गुटख्याचे मालक धारीवाल यांच्याशी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, मध्यप्रदेशातील भाजपचे आमदार हर्षवर्धन राठोड, शैलेंद्र जैन हे तंबाखू उद्योगपती आहे. या तीन उद्योगपती भाजप नेत्यांशिवाय देशातील अन्य तंबाखू उद्योगपतींच्या हितासाठी मोदी सरकारने तंबाखूविरोधी जनजागृती थांबवली असून देशातील कोटय़वधी जनतेला मृत्यूच्या दाढेत सोडल्याची टीकाही डॉ. ढोणे यांनी केली आहे.
संसदीय समितीच्या केवळ दोन बैठका झाल्या असून या बैठकीस वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना न बोलाविता केवळ तंबाखू उद्योगपतींच्या प्रतिनिधींनाच बोलावण्यात आले होते. ऑल इंडिया बिडी इन्डस्ट्री फेडरेशन, फेडरेशन ऑफ कर्नाटका, विरगीनीया टोबॅको ग्रोवर्स असोसिएशन याशिवाय, बिडी, तंबाखू, सिगारेट उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व संघटनांनाच बैठकीसाठी बोलावण्यात आले
होते. यावरून केवळ तंबाखू उद्योगपतींच्या हिताचा निर्णय घेण्याचे सरकारने आधीच ठरवले होते, हे दिसून येते, असेही डॉ. ढोणे यांनी म्हटले आहे.