मतदार याद्यांमधील घोळामुळे नाशिक जिल्ह्यात जवळपास दोन लाख मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले असून संबंधितांना मतदानाची संधी द्यावी, या आग्रही मागणीसाठी सोमवारी भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक विस्कळीत झाली.
नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदाना वेळी मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आला. हजारो मतदारांची नावे वगळली गेल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदार याद्यांमधून काही विशिष्ट नावे वगळण्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या घोळामुळे तब्बल दोन लाख मतदारांना मतदान करता आले नाही. त्यांना मतदानाची पुन्हा संधी द्यावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपने आंदोलनाचे आयोजन केले होते. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, उपमहापौर सतीश कुलकर्णी, संभाजी मोरुस्कर, महेश हिरे, नगरसेविका सीमा हिरे, माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. राज्यात अनेक ठिकाणी या पद्धतीने मतदारांची नावे वगळली गेली आहेत. निवडणूक यंत्रणेच्या कारभाराच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात जवळपास दोन लाख मतदार या घोळामुळे मतदान करू शकले नाहीत. या मतदारांना मतदानाची संधी द्यावी, अशी मागणी सावजी यांनी केली.
एकीकडे छगन भुजबळ कुटुंबियांची नावे दोन ठिकाणी यादीत समाविष्ट करण्याची दक्षता यंत्रणेने घेतली. परंतु, दुसरीकडे सर्वसामान्यांची नावे गायब करण्यात आली. जिवंत मतदारांना मृत दाखविणे, मृत मतदारांची नावे जिवंत मतदार म्हणून असणे, कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी वास्तव्यास असलेल्यांना स्थलांतरित दाखविणे, शेकडो मतदारांची नावे ‘डिलिटेड’या शिक्का मारून काढून टाकणे असे अनेक घोळ मतदार यादीमध्ये झाले आहेत. त्यास कोण जबाबदार आहे, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. साधारणता अर्धा तास चाललेल्या आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत या मार्गावर वाहतुकीचा बराच ताण असतो. त्याच वेळी आंदोलनामुळे अनेक वाहनधारक कोंडीत अडकून पडले.