भारतातील ३६ महाविद्यालयांना नमवून मुंबईच्या के. जे. सोमैया अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ओरायन रेसिंग इंडिया या कारने जे. के. टायर फॉम्र्युला डिझाईन चॅलेंज ही स्पर्धा जिंकली आहे.
या वर्षी प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशातील ३६ महाविद्यालयांमधील ९०० विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘डायमलर’चे अभियांत्रिकी संशोधक आंतरराष्ट्रीय फेलिक शेर्क, ‘रॉबर्ट बॉश जीएमबीए’च्या सिस्टीम इंजिनीअर मारिया बोनिला-टोरस आणि इयन थॉमस अशा आंतराराष्ट्रीय स्तरावरील मोटरस्पोर्टमध्ये अनुभव असलेले तज्ज्ञ या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभले होते.
स्पर्धेच्या विविध टप्प्यांमध्ये ओरायनने एन्ज्युरन्स, फ्युएल एफिशिअन्सी, बिझनेस प्लॅन, डिझाईनसाठीचे विविध किताब खिशात टाकले आहेत. त्यानंतर समारोपाच्या दिवशी संपूर्ण स्पर्धेत ओरायनचेच प्रभुत्व राहिले.
विजेत्यांना जे. के. टायर्सच्या रेस इंजिनीअरसोबत दोन दिवस घालविण्याची संधी मिळणार आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानली जाते. यात त्यांना रेस पीट लेनमध्ये जाऊन रेसिंगचा थरार अनुभवता येणार आहे. हे यश मिळविण्याकरिता आमच्या चमूतील प्रत्येक जण दिवसरात्र झटत होता, अशी प्रतिक्रिया टीमचा प्रमुख करण भन्साळी याने व्यक्त केली.