लोकमान्य टिळकांनी ज्या उद्येशाने गणेशोत्सव सुरू केला तो उद्देश गेल्या काही वर्षांत कमी झाला असून मंडळांमध्ये आकर्षक सजावटीवर भर दिला जात आहे. मात्र, त्यातही काही गणेश मंडळ संस्कृती आणि परंपरेचे जतन करून गणेशोत्सव साजरा करीत आहे. तब्बल १२० वर्षांची वाटचाल करताना समाजप्रबोधन ते व्यावसायिकीकरण अशी वळणे घेत गेलेल्या नागपूरच्या सीताबर्डीवरील राजाराम वाचनालयाच्या गणेशोत्सवाने महाराष्ट्रच नव्हे, तर देश- विदेशातही मानाचे स्थान मिळविले आहे.
समाजप्रबोधनाच्या या ‘धार्मिक’ व्यासपीठाने देशाच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर पर्वात घडलेल्या अनेक राजकीय, आíथक, सामाजिक चढउतारांचे विविध पैलू अनुभवले. देशापुढे वेळोवेळी उभे राहिलेले कठीण प्रश्नही याच व्यासपीठावर प्रतििबबित झाले. राजकीय पुढारी, नामांकित साहित्यिक, वक्ते व कलावंतांना याच व्यासपीठावरून लोकांना अनुभवता आले. केवळ विघ्नहर्त्यांची प्रतिमा मांडून केल्या जाणाऱ्या विधी-विधानांच्या पलीकडे जाऊन प्रबोधन साधण्याचा प्रयत्न त्यातून झाला. अशा परंपरेत बसणाऱ्या मोजक्या नावांमध्ये याही गणेशोत्सवाचे नाव घ्यावे लागते.
डीजेच्या कलकलाटात ध्वनिप्रदूषण होण्यापेक्षा वैचारिक देवाणघेवाण होऊन समाजप्रबोधन करावे, या उद्देशाने वाचनालयातर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे कार्य सुरू आहे. लोकमान्य टिळकांच्या नागपुरातील अनुयायांनी राजाराम वाचनालयात गणेश पूजनास प्रारंभ केला तो काळ होता १८९५ चा. गणेशोत्सवात भक्तांनी दिलेल्या देणगीतून वाचनालयासमोर असलेल्या नाल्यावर पूल बांधून या गणेश मंडळाने जनजागरणाचा ‘श्रीगणेशा’ केला. देशात समाजसुधारणेचे वारे वाहू लागले तेव्हा गणेशोत्सवाची विभागणी करून, सोवळ्या व ओवळ्या अशा दोन गणपतींची प्राणप्रतिष्ठा केली. जुन्या कर्मकांडानुसार करावयाचे कार्यक्रम सोवळ्यासमोर, तर राष्ट्रीय चेतना, जाती निर्मूलन यासारखे कार्यक्रम ओवळ्यासमोर केले जात. नागपुरातील जुन्या पिढीतील अनेक धुरंधर राजकारणी व समाजसुधारकांनी यात हिरिरीने भाग घेतला. न्या. भवानीशंकर नियोगी, बॅरिस्टर हिदायतुल्ला यांनीही यात काम केल्याचे दाखले सापडतात. नागपूरच्या सामाजिक- सांस्कृतिक जडणघडणीत या गणेशोत्सवाचे मोलाचे योगदान आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वाचनालयांना भेटी दिल्या, तर सेतू माधवराव पगडी, बाळशास्त्री हरदास, अनंत गोपाळ शेवडे, व.पु. काळे, पु.ल. देशपांडे, आ.रा. देशपांडे (कवी अनिल), कुसुमावती देशपांडे, राम शेवाळकर, मधुकर आष्टीकर या साहित्य संशोधन क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने झालेली आहेत. भाऊसाहेब माडखोलकर, वामनराव चोरघडे, डॉ. वि. भि. कोलते, न्या. भवानीशंकर नियोगी, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, रा.स्व. संघाचे आद्य सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, दत्तोपंत ठेंगडी, ग.त्र्यं. माडखोलकर, बा.शि. मुंजे, वि.भा. देशपांडे आदी मान्यवरांनी या गणेशोत्सवासाठी मदतीचा हात दिलेला आहे. तसेच स्वेच्छेने हातभार लावणाऱ्यांमध्ये शहरातील डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, माजी सैनिकांचाही समावेश आहे. शिक्षण, कला, साहित्य अशा विविध क्षेत्रात चमकलेल्या गुणवंतांचा सत्कार करणे, हे या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्टय़ आजतागायत सुरू आहे.