‘बॉलिवूडची बबली’ राणी मुखर्जी आणि यशराज स्टुडिओचा कर्ताधर्ता आदित्य चोप्रा यांच्या प्रेमसंबंधांबद्दल कायम कुजबूज होत आली आहे. मात्र, आजवर या दोघांनी कधीही त्याची कबुली दिलेली नाही की त्यांच्याकडून ते काढून घेणेही कोणाला जमलेले नाही. पण, शॉटगन शत्रुघ्न सिन्हाने मात्र अभावितपणे (?) हे भांडे फोडले! यूटीव्हीच्या ‘स्टार्स वॉक ऑफ स्टार्स’ या उपक्रमांतर्गत यश चोप्रा यांच्या पुतळ्याचे अनावरण वांद्रे येथे सोमवारी करण्यात आले. त्यावेळी चोप्रा कुटुंबियांसोबत उपस्थित असलेल्या राणीचा उल्लेख शत्रुघ्न सिन्हाने  ‘राणी चोप्रा’ असा केला. हा उल्लेख चुकून, अनवधानाने झाला की जाणीवपूर्वक झाला ते शत्रुघ्न सिन्हालाच माहीत. मात्र त्याच्या या युक्तीला राणी आणि चोप्रा कुटुंबियांकडूनही दाद न मिळाल्याने शॉटगनचा हा बार हवेतच विरला.
हिंदी चित्रपटसृष्टी आणि यश चोप्रा हे अजबगजब समीकरण आहे. आपल्या दर्जेदार चित्रपटांच्या जोरावर ‘यशराज’सारखे साम्राज्य उभे करणाऱ्या यश चोप्रा यांची आठवण म्हणून यूटीव्हीने वांद्रे येथे आपल्या ‘स्टार्स वॉक ऑफ स्टार्स’ उपक्रमांतर्गत त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. याआधी तिथे राज कपूर, देव आनंद आणि शम्मी कपूर यांचे पुतळे विराजमान आहेत. आता आपली खास टोपी परिधान करून कॅमेऱ्याला रेलून उभे असणाऱ्या यश चोप्रांचा पुतळाही तेथे दिमाखात स्थानापन्न होत आहे. यश चोप्रा यांची पत्नी पामेला आणि मुलगा उदय यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. यशराजच्या कार्यक्रमांना नेहमीच उपस्थित असते तशी राणी मुखर्जी चोप्रा कुटुंबियांसमवेत तिथे जातीने उपस्थित होती. यावेळी चोप्रा कुटुंबियांचा उल्लेख करताना शत्रुघ्न सिन्हाने पामेला चोप्रा, उदय, राणी आणि अन्य सदस्य असे म्हटले. आणि लगेचच, ‘माझ्या पत्नीने मी आदित्यचे नाव घेतले नाही याची जाणीव करून दिली. पण, मी राणी चोप्राचे नाव घेतले म्हणजेच आदित्यचेही नाव घेतले’, अशी पुस्तीही जोडली. आता शत्रुघ्नने जाणूनबुजून हा उल्लेख केला की चुकून झाला हे ज्याचे त्याने समजून घ्यावे.
 शत्रुघ्न सिन्हाच्या या वक्तव्याचा राणीवर मात्र फारसा परिणाम झाला नाही. यश चोप्रांच्या आठवणीने भावुक झालेल्या राणीने यशअंकल आणि त्यांच्या चाहत्यांसाठी विशेषत: त्यांच्या कुटुंबियांसाठी हा अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले. तर पामेला चोप्रांनी आपल्या पतीच्या कर्तृत्वााचे उदाहरण या पुतळ्याच्या रूपाने चाहत्यांसमोर ठेवल्याबद्दल यूटीव्हीचे आभार मानले. यावेळी पूनम धिल्लॉं, प्रेम चोप्रा, कबीर खान, परिणीती चोप्रा, वैभवी र्मचट यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.