कोपरखैरणे येथे शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या वृद्धाला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईसोबत त्याचे घटनेच्या काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. यावेळी झालेल्या अपमानाने तो सूडाने पेटला होता. या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्याने त्या मुलीवर बलात्कार केला असल्याची कबुली दिल्याने पोलीस देखील सून्न झाले होते. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अफाजुद्दीन मोहबत शेख असे या आरोपीचे नाव आहे. सेक्टर १९ येथील खाडी शेजारी असलेल्या झोपडपट्टीतील तो राहणारा आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे शेजारी राहणाऱ्या महिलेशी भांडण झाले होते. यावेळी त्या महिलेने चारचौघांत त्याला सुनावले होते. या अपमानाने तो सूडाने पेटला होता. दरम्यान गुरुवारी त्या महिलेची मुलगी घराशेजारी खेळत असताना खाऊचे आमिष दाखवून शेख याने तिला घरी नेले होते.
तिला दिलेल्या खाऊत त्याने गुंगीचे औषध मिसळले होते. यानंतर तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला होता. घरी आल्यानंतर पीडित मुलगी ग्लानी येऊन कोसळली होती. तिला तातडीने महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा अधिक तपास करीत असताना पीडित मुलीला शेख याने खाऊ देतो असे सांगत घरी नेली असल्याचे समोर आले. शेख याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने या गुन्हाची अखेर कबुली दिली. शेख याला वाशी न्यायालयात हजर केले असता, ६ सष्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी दिली आहे.