समाजातील गोरगरीब आणि शेतक ऱ्यांसाठी समाज सुधारणेचे काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिशा दिली असून नव्या भारताची सुरुवात त्यांनी त्या काळात केली होती. त्यामुळे त्यांच्या विचारांवर राज्यकर्त्यांनी काम करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी समारोहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. रेशीमबागेतील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महापौर प्रवीण दटके, आमदार डॉ. मिलिंद माने, नागो गाणार, माजी आमदार अशोक मानकर, अविनाश ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार, शंकरराव लिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महादेवराव श्रीखंडे आणि सरोज काळे यांना अनुक्रमे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एशियन योगा स्पर्धा सुवर्णपदक प्राप्त धनश्री लेकुरवाळे हिचा सन्मान करण्यात आला.
ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि त्या काळात सावित्रीबाई फुले यांच्यासाठी पहिली सुरू शाळा सुरू केली. आता शिक्षणामध्ये सक्तीचा कायदा आला असला तरी त्या काळात त्यांनी महिलांना शिक्षणासाठी प्रेरीत केले. शिक्षणाच्या माध्यमातून देशात परिवर्तन होऊ शकते हा विचार त्यांनी मांडला होता. प्रवाहाच्या विरोधात त्यांनी काम केले होते. सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पुण्यातील पहिल्या शाळेचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वी ८ कोटी रुपये त्या शाळेसाठी जाहीर करण्यात आले होते मात्र अजून पैसा लागला तर राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे. महात्मा फुले यांच्या नावाने समग्र साहित्य आणि अध्ययन केंद्र स्थापन करण्यासंदर्भातील आराखडा तयार करून त्यावर लवकरच निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. हे अध्ययन केंद्र नागपुरात करायचे की दुसरीकडे याबाबत मात्र विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
समाजातर्फे विविध उपक्रम राबविले जात असताना जयंती आणि पुण्यातिथी साजरी करतो. हे सर्व कार्यक्रमात केवळ औपचारिकता म्हणून न करता समाजात परिवर्तन होऊन तो शिक्षित झाला पाहिजे यासाठी संस्थेने काम करावे, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी अरुण पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेंद्र आर्य यांनी केले. यावेळी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसह आचार्य पदवी संपादन करणाऱ्या आणि सामाजिक काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मंजुषा सावरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.