मागील दहा दिवसांपासून काश्मीरमधील प्रलयंकारी महापुरात अडकलेले डोंबिवलीतील शिंदे कुटुंबीयांचे रविवारी रात्री शहरात आगमन झाले. नातेवाईक, स्वकीयांच्या उपस्थितीत, वाजतगाजत त्यांचे स्वागत करण्यात आले. आपल्या हक्काच्या राहत्या घरापासून दहा दिवस दूर राहिल्याने आलेला दुरावा घरात प्रवेश करताच त्यांनी आनंदाश्रूंनी दूर केला.
डोंबिवलीतील विक्रांत, अर्चना आणि विविया शिंदे हे कुटुंब मागील दहा दिवसांपासून श्रीनगरमध्ये पुरात अडकले होते. परतीची कोणतीही साधने नाही, संपर्क नाही. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांचे डोंबिवलीतील सर्व नातेवाईक हवालदिल झाले होते. विक्रांतचे आई, बाबा दूरचित्र वाहिन्यांसमोर बसून काश्मीरमधील पुराची परिस्थिती काय आहे हे पाहात होते. रविवारी रात्री विक्रांत घरात येताच कुटुबीयांच्या मनाचे बांध फुटले. दहा दिवसांचे तुटलेले अंतर आनंदाश्रूंनी भरून काढले. विक्रांत शिंदे यांनी यावेळी श्रीनगरमधील पुराची भयकथा उपस्थितांना सांगितली. महापुरापेक्षा पुराच्या पाण्यातील थंडपणा, त्यावर पसरेला इंधनाचा तवंग जीवाचा थरकाप उडवत होता. श्रीनगर परिसरातील पेट्रोलपंप, वाहनांमधील इंधन पाण्यावर तरंगत होते.
या इंधनाने पेट घेतला तर करायचे काय असा एक गंभीर प्रश्न मनाला सतावत होता. वीजपुरवठा खंडित असल्याने मेणबत्त्या, लायटरचा वापर करण्यात येत होता. श्रीनगरमधील ग्रॅन्ड मुमताझ हॉटेलमध्ये अडकलो होतो. तेथे एक कामगार पुराच्या पाण्यातून पाच कि.मी. पोहून आला होता. चार ते पाच ब्लॅन्केट त्याच्या भोवती गुंडाळूनही तो कुडकुडत होता. संध्याकाळी पाचनंतर सर्वदूर पुराचे पाणी, भयाण काळोख्या रात्रीचा अनुभव थरकाप उडविणारा होता, असे विक्रांत यांनी सांगितले.