शहराच्या इतिहासात ५० वर्षांत प्रथमच लोकसहभागातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानातंर्गत १३ लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा बांधण्यात येणार असून दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेचे पालकत्व लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राईडने घेतले असून बंधाऱ्यात सुमारे एक कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. या बंधाऱ्याचे भूमिपूजन पांझण नदीपात्रात लायन्स क्लबचे अध्यक्ष हेमराज दुग्गड, प्रकल्प अध्यक्ष दिनेश मुनोत यांच्या हस्ते झाले.
नदीपात्रात ५० ते ६० वर्षांपासून साचलेला शेकडो टन गाळ लोकसहभागातून मनमाड बचाव कृती समितीच्या पुढाकाराने काढण्यात आला आहे. आता या भागात जॉगिंग ट्रॅकसह बगिचा करण्यात येणार आहे. लायन्स क्लबचे पदाधिकारी दुग्गड, मुनोत, दिनेश आव्हाड यांसह सदस्यांनी स्वखर्चातून १३ लाख रुपयांच्या या बंधाऱ्याच्या कामास सुरूवात केली आहे. लोकसहभागातून हा प्रकल्प होत असल्याने ज्यांना मदत करावयाची असेल त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही क्लबतर्फे करण्यात आले आहे.
याप्रसंगी मनमाड बचाव समितीचे अशोक परदेशी, राजकमल पांडे, राजेंद्र पारिक आदी उपस्थित होते.