विंचूर-प्रकाशा आणि औरंगाबाद-अहवा या दोन राज्य महामार्गावर वसलेल्या येथील बस स्थानकातील समस्या अनेक वर्षांपासून कायम असून त्यांना तोंड देत प्रवाशांना आपला पुढील प्रवास करावा लागत आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण केल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आले. बागलाण तालुक्यातील सर्व बस स्थानक, थांबे तसेच विस्कळीत बससेवा सुरळीत करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
दोन राज्य महामार्ग आणि सुमारे १०० खेडय़ा-पाडय़ांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ताहाराबादची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या येथील स्थानकातील अनेक समस्या कित्येक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहेत. स्थानकातील अस्वच्छतेने तर कळस गाठला आहे. स्थानकात स्वच्छता कामगारही नव्हता. स्थानकातील प्रसाधनगृहात अस्वच्छतेने कहर केला आहे. त्यात काही समाजकंटकांनी भिंत पाडल्याने महिला आणि पुरूषांचे प्रसाधनगृह एकच झाले आहे. या सर्व समस्या दूर करण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. तरीही कोणतीच कार्यवाही न झाल्याने युवक काँग्रेसचे बागलाण विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस यशवंत पवार, निवृत्ती सोनवणे, मिलींद चित्ते यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण केले. त्यावेळी तत्काळ डागडुजी, स्वच्छता कामगाराची नेमणूक आणि दोन महिन्यात प्रक्रियेनुसार नवीन अद्ययावत शौचालयाच्या बांधकामाचे आश्वासन परिवहन अधिकाऱ्यांनी दिले.
या आश्वासनानुसार डागडुजी करण्यात आली. तसेच स्वच्छता कामगाराची नेमणूक करण्यात आली. परंतु नवीन अद्ययावत शौचालय अद्याप झालेले नाही. हे काम होण्यासाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आठवडाभरात महामंडळाकडून याप्रश्नी कार्यवाही न झाल्यास युवक काँग्रेसच्या वतीने ताहाराबाद बस स्थानकासह नामपूर, लखमापूर, ब्राह्मणगाव, डांगसौंदाणे, जायखेडा या प्रमुख गावांबरोबर प्रत्येक थांब्यावर निवारागृह, बस स्थानकांच्या सोयीसाठी तसेच ग्रामीण भागातील विस्कळीत बससेवा सुरळीत करावा या मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा कोठावदे यांनी दिला आहे.