भरतीमुळे बांध फुटून भातशेतीत समुद्राचे पाणी शिरण्याची भीती
समुद्राला येणाऱ्या महाकाय उधाणापासून संरक्षण करण्यासाठी मोठमोठे बांध तयार करून बंदिस्ती उभारलेली आहे. ही बंदिस्ती कमकुवत झाल्याने समुद्राच्या मोठय़ा भरतीच्या वेळी बांधारे फुटून समुद्राचे खारे पाणी भातशेती शिरते आणि त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक होत आहे. यावर उपाय म्हणून खार लँड विभागाने २०१२ पासून खोपटे ते कोप्रोलीदरम्यानच्या सात किलोमीटरच्या बंदिस्तीचे ४ कोटी रुपयांचे काम सुरू केलेले आहे. मात्र कंत्राटदाराला वेळेत पैसे मिळत नसल्याने बंदिस्तीचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. याचा फटका या परिसरातील ७०२ हेक्टर जमिनीला बसून जमीन नापीक होण्याची भीती खोपटा, कोप्रोली तसेच मोठी जुई येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ही समस्या मंगळवारी खोपटे येथील सांसद आदर्श ग्राम योजनेच्या कार्यक्रमाच्या वेळी खासदारांसमोरही शेतकऱ्यांनी मांडली.
अनेक संकटांवर मात करीत आज शेतकरी शेती करीत असताना शासनाच्या खार लँड विभागाकडून मंजूर झालेल्या कामाचा निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याने शेकडो हेक्टर जमिनीत समुद्राचे पाणी जाऊन जमीन नापीक होण्याची भीती आहे. समुद्राचे पाणी शेतीत शिरले की पुढील किमान तीन ते चार वर्षे शेतकऱ्याला या शेतीत पीक घेता येत नसल्याची माहिती खोपटे येथील शेतकरी अनंत ठाकूर यांनी दिली आहे. तसेच तीन वर्षे शेती पूर्ववत करण्यासाठी अपार मेहनत करावी लागते. आजच्या मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे मजूरही मिळत नाहीत, तसेच मिळालेच तर ते परवडत नाही, अशा अवस्थेत शेतकरी सापडला आहे. उरण तालुक्यातील पंधरा ते वीस किलोमीटर अंतराची बंदिस्ती असून खोपटापासून कोप्रोलीपर्यंतच्या सात किलोमीटरवर खार लँडचा खर्च होतो, तर उर्वरित बांधारा खाजगी पद्धतीने दुरूस्त केला जात असल्याची माहिती पेण येथील खार लँडचे अभियंता एस. जी. पोतदार यांनी दिली आहे. २०१२ साली सुरू करण्यात आलेल्या सात किलोमीटरच्या बांधाऱ्याचे काम जून २०१५ पर्यंत कंत्राटदाराने पूर्ण करावयाचे आहे. मात्र निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याने कंत्राटदाराकडून धिम्या गतीने काम सुरू असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यामुळे जर वेळेत काम पूर्ण झाले नाही तर या विभागातील शेकडो हेक्टर जमिनीला समुद्राच्या उधाणाच्या पाण्याचा धोका संभवत असल्याची शंका शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.