यापूर्वीच्या पिढीने सगळे काही करून ठेवलेय त्यावरूनच आपल्याला पुढे चालायचे आहे, असा विचार करून प्रत्येक नागरिक, व्यवस्थेतील वेगवेगळे घटक वाटचाल करू लागल्याने विचारांचा व्यवहार आता थांबला आहे. आम्ही थोर विचारवंत या आत्मखुशीत जो-तो वावरत आहे. विचारांची देवाणघेवाण थांबल्याने राज्याची काय संपूर्ण देशाची प्रगती खुंटल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी बुधवारी  येथे  केले.
रोटरी क्लब, डोंबिवली पूर्वतर्फे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील रोटरी भवन येथे ‘रोटरी मुक्त विचार व्यासपीठाचे’ उद्घाटन गिरीश कुबेर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. उल्हास कोल्हटकर, मुकुंद इनामदार, डॉ. स्वाती गाडगीळ, विकास संकुलकर उपस्थित होते.
अर्थ, उद्योग, व्यवस्था किंवा अन्य कोणत्याही प्रक्रियेत प्रगती करायची असेल तर विचार हा त्यामधील महत्त्वाचा मूलभूत घटक आहे. गोपाळ गणेश आगरकर, न्या. महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, वि. का. राजवाडे, दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे, नरहर कुरुंदकर यांनी कोणत्याही व्यवस्थेशी तडजोड न करता प्रभावी विचार समाजाला दिला. हा विचार व्यवहार आता थांबल्याने राज्यात काय आपण राष्ट्रीय पातळीवरही दिशाहीन झालो आहोत. नवीन विचार, सत्य मांडण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर व्यवस्थाच तुटून पडते, असा विचार जेथे दडपून टाकला जातो, तो प्रदेश, ती व्यवस्था कधीही सक्षमपणे उभी राहू शकत नाही, असे कुबेर यांनी सांगितले.
एक विचार देशाला कसा प्रगतीच्या वाटेवर नेतो याचे उदाहरण देताना कुबेर म्हणाले, फ्रँकफर्ट देशाने इ.स. ११५६ मध्ये देशात व्यापारी केंद्र असावे असा विचार केला होता. विचार व्यवहारावर वाटचाल करणारे असे अनेक परकीय देश स्वत:च्या पायावर समर्थपणे आज उभे आहेत. कशात काहीही नसताना भारतीय मात्र महासत्तेच्या बाळबोध गप्पा मारत असल्याची टीका कुबेर यांनी केली. विचार करायचा नाही अशा साचेबद्ध व्यवस्थेत आपण भारतीय अडकत चाललो आहोत. या व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मुक्त विचार व्यासपीठ ही काळाची गरज आहे. डोंबिवलीत हा उपक्रम सुरू होत असल्याचे कौतुक आहे. अशी व्यासपीठे गावागावात सुरू झाली पाहिजेत. या माध्यमातून प्रश्नकर्ते जन्माला येतील आणि विचार, विकासाचा एक नवीन प्रवाह सुरू होईल, असे ते म्हणाले.