राज्यातील पहिली वाहतूक पोलीस ई-चलान प्रक्रिया नवी मुंबईत अधिक व्यापक प्रमाणात राबविली जात असून गेल्या वीस दिवसांत १०२ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे. पोलिसांनी मोक्याच्या सिग्नलवर लावलेल्या जनजागृती फलकामुळे सुशिक्षित वाहनचालकांमध्ये जनजागृतीचे प्रमाण वाढल्याचा विश्वास पोलिसांना वाटू लागला आहे. मात्र घरपोच ई-चलान पाठविताना पोलिसांना बिनचूक पत्त्याअभावी अडचणी येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत केवळ पाच वाहनचालकांनी प्रामाणिकपणे वाहतूक पोलीस चौकीत येऊन दंड भरलेला आहे.
विकसित परदेशात महामार्गावर जागोजागी लागलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना घरपोच दंड पावती पोहचविण्याची सुविधा आहे. देशात दिल्लीनंतर आणि राज्यात पहिल्यांदाच ही पद्धत नवी मुंबई पोलिसांनी दोन ऑगस्टपासून प्रत्यक्षात आणली आहे.
त्यासाठी पालिकेने शहरात लावलेल्या एकूण २६२ सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग केला जात असून पामबीच, ठाणे-बेलापूर व मुलुंड ऐरोली महामार्गावरील वाहतूक देखरेखीखाली ठेवण्यात आली आहे. त्यासाठी बेलापूर येथील पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक वेगळा कक्ष आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
हे पोलीस शहरात महत्त्वाच्या मार्गावर झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभ्या राहणारी वाहने, सिग्नल तोडणारे, सिट बेल्ट न लावणारे, फॅन्सी नंबर प्लेट मिरवणाऱ्या वाहनचालकांचे क्रमांक टिपून त्यांना त्यांच्या पत्त्यावर वाहतूक पोलिसांकरवी दंडपावती पाठवीत आहेत. अशा प्रकारे शंभरहून अधिक वाहनचालकांना दंड पावती पाठविण्यात आल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप कुन्नुलू यांनी दिली. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मागील वीस दिवसांत तीन टक्के वाहनचालकांमध्ये या प्रक्रियेबाबत जनजागृती पसरली असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबई हे सुशिक्षित (९६ टक्के) शहर असल्याने या शहरात वाहतूक नियमांविषयी लवकर जागृती होणार असल्याचा विश्वास पोलिसांना वाटत आहे. दंड पावती पाठविताना मात्र पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत असून ही पावती नियमाप्रमाणे प्रथम मुंबईत मुख्य पोस्ट कार्यालयात जात असून नंतर ती पुन्हा नवी मुंबईत येत आहे. त्यामुळे त्यात वेळ जात असल्याचे पोलिसांचे मत आहे. ही सुविधा सुलभ झाल्यास दंडपावती पोहचविणे अधिक सोपे होणार आहे. पोलिसांच्या वतीने १०० पेक्षा जास्त दंडपावती पाठविण्यात आली असली तरी पाच वाहनचालकांनी सीबीडी येथील वाहतूक पोलीस चौकीत दंड भरलेला आहे. हा दंड ऑनलाइनदेखील भरता येणार आहे.